नांदेड(प्रतिनिधी)-कोट्यावधी रुपये खर्च करून अभियांत्रिकी पध्दतीने चुकीच्या प्रक्रियेतून तयार झालेल्या फुले मार्केट ते गणेशनगर रस्त्याचे कामकाज कोणत्याही तांत्रिक पात्रतेशिवाय सुरू आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमंाक 7 व 8 मध्ये होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन दि.3 जानेवारी 2021 रोजी नांदेडचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. एखाद्या रस्त्याचे काम करत असतांना त्यासाठी आवश्यक असलेली अभियांत्रीकी पध्दत अंमलातच आणली गेली नाही. कोणताही रस्ता करतांना त्याच्यासाठी एका विहित खोलीपर्यंत हा रस्ता उघड करावा लागतो. त्यानंतर त्यात दगड, वाळू, कमी अधिक दर्जाची गिट्टी टाकून त्यावर रोलरच्या माध्यमाने पुर्णदबावाने दाबण्याची प्रक्रिया करावी लागते. आणि सगळ्यात शेवटी सिमेंट रस्ता तयार करायचा असतो. ही पध्दत सिव्हील अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या एका तज्ञ माणसाने सांगितली.
फुले मार्केट ते गणेशनगर रस्त्याचे कामकाज सुरू झाले तेंव्हा त्याच ठिकाणची माती काढून त्याच ठिकाणी ठेवली गेली आणि पुन्हा तीच माती त्यावर टाकली गेली. त्यावर रोड रोलरचा कांही एक उपयोग कधी केलेल्या दिसला नाही. हा रस्ता तयार करतांना कोणत्याही प्रकारचे दगड, गिट्टी, वाळू याचा उपयोग झालेला नाही. शेवटी सिमेंट रस्ता तयार होतांना दोन रस्त्यांच्या मध्ये दोन फुटाची एक गजाळी आणि ती सुध्दा सर्वात बारीक टाकली जात आहे सिमेंट कॉंक्रीट टाकण्याअगोदर त्या रस्त्यावर एक काळ्या रंगाचे पॉलिथीन अंथरले जाते आणि त्यावर सिमेंट रस्ता तयार होत आहे. याबाबत अभियांत्रिकी तज्ञाला विचारले असता तो सांगत होता की, हा रस्ता कांही दिवसातच तडे जातील आणि हा रस्ता खुप कांही दिवस टिकणार नाही.
