

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील बेवरस पडलेल्या दुचाकी वाहनांना लिलावाद्वारे विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दि.23 जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अशाच बेवारस असलेल्या 30 दुचाकी गाड्यांची विक्री भंगार या संज्ञेत होणार आहे.
पोलीस दलाच्या कामकाजामध्ये कांही गाड्या बेवारस अवस्थेत पकडल्या जातात. त्यांच्या मालकीचे कागदपत्र उपलब्ध नसतात कोणी त्या गाड्यांसाठी मालकीचा दावा सुध्दा करत नाहीत. अशा गाड्या अनेक वर्ष पडून राहतात. सध्या नांदेड जिल्ह्यात अशा सर्व वाहनांना शासकीय प्रक्रिया पुर्ण करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसीलदार नांदेड यांच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात बेवारस असलेल्या 30 दुचाकी गाड्यांची विक्री भंगार (स्क्रॅप) या सदरात केली जाणार आहे. त्यासाठी 23 जुलै 2021 हा दिवस या दुचाकी गाड्या लिलाव पध्दतीने विक्री होण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या लिलावामध्ये जनतेने जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांनी केले आहे. बेवारस असलेल्या दुचाकी गाड्या पाहण्यासाठी पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या प्रांगणात उभ्या आहेत. या बाबत कांही माहिती हवी असेल तर 02462-256520 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येईल. काही कारणास्तव एखाद्या गाडीचा किंवा कांही गाड्यांच्या संदर्भाने प्रश्न निर्माण झाला तर ती अथवा त्या गाड्या लिलावापासून वेगळ्या करण्यात येतील.