नांदेड

जुलै महिन्यातील पावसाने वाळू माफियांना ‘अच्छे दिन’

नांदेड(प्रतिनिधी)- जुलै महिन्यात पावसाने भरपूर हजेरी लावली त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले. भावसाने दिलेली जबर हजेरी वाळू माफियांसाठी वरदानच ठरली. कारण जेवढे जास्त पाणी विष्णुपूरी प्रकल्पातून सोडले जाते. तेवढ्याच चांगल्या पध्दतीने वाळू घाट भरत असतात. त्यामुळे पावसाने वाळू माफियांचे अच्छे दिन आणले आहेत.
अवैध प्रकारारे वाळू उत्खनन करून त्याची विक्री करण्यात पटाईत असणाऱ्या वाळू माफियांना जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पुन्हा अच्छे दिन आणले आहेत. पावसाच्या अगोदर सुध्दा बेकायदेशीर वाळू उत्खनन करून शासनाचा महसुल बुडवत मोठी कमाई करण्यात मग्न असलेल्या वाळू माफियांना कांही दिवस आपले कामकाज बंद ठेवावे लागले होते. विष्णुपूरी प्रकल्पातून जास्त दरवाजे उघडल्यानंतर पाण्याचा प्रवाह मोठा होतो आणि त्यातून दुर्घटना होवू शकते म्हणून वाळू माफियांनी आपले कामकाज बंद ठेवले होते.
सध्याच्या परिस्थितीत विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरच्या भागात भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे विष्णुपूरीत येणारा पाणी साठा वाढतच होता. विष्णुपूरीच्या वरच्या भागातून येणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील वरच्या भागातील वाळू घाट सुध्दा भरले आहेत. आणि विष्णुपूरी धरणाचा पाणी साठा वाढल्यामुळे त्यातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या भागातील रिकामी झालेली वाळू पुन्हा भरली आहे. हे वाळू माफियांसाठी अच्छे दिनच आहेत. आज शहरातील गोवर्धनघाट पुलाखाली तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याचे छायाचित्र उपलब्ध झाले. त्यामुळे अवैध वाळू उपसा पुन्हा सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.विष्णुपूरी प्रकल्पाच्या मागील भागात सुध्दा वाळू साठा वाढला असून त्याचा ही उपसा सुरू झाला आहे.
वाळूवर कार्यवाही करण्याची प्रमुख जबाबदारी महसुल विभागाची आहे. काही तराफे जाळून ते फोटो प्रसार माध्यमांना पाठविण्यात पटाईत असलेल्या महसुल विभागाला पाणी जास्त प्रवाहीत
झाल्यानंतर वाळू घाट भरतील आणि वाळू माफियांना अच्छे दिन येतील याची जाण नसेल असे म्हणता येणार नाही. व्यासपिठावरून गप्पा मारतांना सर्वच जण अवैध कामांचा विरोध करतात तरीपण अवैध कामे राजरोसपणे सुरू राहतात. या मागचे गणित प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहित किंवा देवाला माहित. 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.