

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये फुकटात प्रवास करणार्या १२८५ फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे विभागाने ५ दिवसात ६ लाख रुपये दंड वसुल केला आहे. रेल्वे विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, दंडापासून वाचण्यासाठी तिकिट खरेदी करून प्रवास करा.
दि.१० जुलै ते १५ जुलैदरम्यान रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील यांच्या नेतृत्वात रेल्वे विभागाच्या तपासणीसांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुतपणे राबवलेल्या या मोहिमेत रेल्वे विभागाने नांदेड-मुदखेड, नांदेड-आदिलाबाद, नांदेड-मनमाड, नांदेड-अकोला या मार्गांवर धावणार्या विविध रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी केली. या तपासणीत १२८५ प्रवासी विना तिकिट प्रवास करतांना आढळले. सोबतच कांही प्रवाशांकडे परवानगी पेक्षा जास्त सामान होते. त्यामुळे अशा अनियमित प्रवास करणार्या परवानगी पेक्षा जास्त सामान घेवून प्रवास करणार्या फुकट्यांवर कार्यवाही करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ६ लाख १० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.
ही तपासणी मोहिम बिना तिकिट प्रवास करणार्यांवर वचक राहावा म्हणुन करण्यात आली होती. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक नुकसानपण होते आणि जनतेमध्ये वेगळीच भावना तयार होते. जय पाटील यांनी आवाहन केले आहे की, योग्य तिकिट घेवून प्रवास करावा आणि होणार्या कार्यवाहीला टाळावे. कोविड-१९ च्या नियमावलीला आधार मानून प्रवाशांनी रेल्वेमध्ये प्रवास करावा.
—-