नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस ई चालानच्या माध्यमातून शासनाचे 39 लाख 95 हजार 270 रुपयांचा अपहार करणाऱ्या दोन सहाय्यक निबंधक आणि तीन लिपिकांना अर्धापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश बिरहारी यांनी 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अर्धापूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 गोपीनाथ मारोतीराव गडगिळे यांनी सन 2020 मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करतांना बनावट ई चलनाच्या माध्यमातून शासनाला जमा होणारी रक्कम 39 लाख 95 हजार 270 रुपये गायब करण्यात आली होती. अर्थात अपहार झाला होता. त्यावेळी अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 39/2020 दाखल केला. त्यामध्ये भारतीय दंडविधानाची कलमे 420, 409, 406, 467, 468, 471, 477(अ) आणि 34 यांचा समावेश होता. दिलेल्या तक्रारीमध्ये तत्कालीन कंत्राटी संगणक चालक पांडूरंग व्यंकट कुलकर्णी (27) आणि नारायण प्रकाश शेवाळकर (71) यांची नावे सुध्दा पोलीस प्राथमिकीमध्ये होती.
गुन्ह्यातील अपहाराची रक्कम 40 लाखांच्या आसपास होती म्हणून हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाला. पहिल्यांदा पांडूरंग कुलकर्णी आणि नारायण शेवाळकर यांना अटक झाली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुभान केंद्रे यांच्याकडे होता. गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीनुसार सुभान केंद्रे यांनी दुय्यम निबंधक श्रेणी-1 दिलीपकुमार लक्ष्मीनारायण चांडक (50) रा.ज्ञानेश्र्वरनगर अकोला आणि दुसरे उपनिबंधक प्रकाश राजाराम कुरुडे (50) रा.शिरळी ता.वसमत जि.हिंगोली या दोघांसह रामदास गंगाराम झंपलवाड (47), मनोहर कोनेरी बोधगिरे (46) दोघे रा.जंगमवाडी कंधार आणि शरद अशोकराव काळे रा.लईजाईनगर वाडी बु नांदेड अशा तिन लिपीकांना पकडले. दोन सहाय्यक निबंधक आणि तीन लिपीक यांना आर्थिक गुन्हा शाखेने अर्धापूर न्यायालयात हजर करून या सर्व लोकांनी एखादा दस्त तयार होतांना शासनास भरावी लागणारी रक्कम बनावट ई चालन बनवून स्वत:च लाटली आहे. याबाबत सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले. अर्धापूरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश बिरहारी यांनी पोलीसांचा युक्तीवाद ऐकून दोन सहाय्यक निंबंधक आणि तीन लिपीक यांना 21 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
