बातमीमुळे शेख जाकेर शेख सगीरची अब्रू नुकसानी झाली म्हणे..
नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारांनी एखाद्या अर्जाची पोच पावती घेवून, अर्ज देणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांना बातमीत बदलले तर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होवू शकतो आणि पोलीसांनी लावलेला जावई शोध म्हणजे त्या अदखल पात्र गुन्ह्याच्या परिणामात फौजदारी प्रक्रिया संहितेची कलम 149 प्रमाणे नोटीस सुध्दा जारी होते. त्यामुळे बातम्या लिहितांना फक्त पोच लिहिलेला अर्ज बातमीसाठी परिपुर्ण नाही असे आज तरी वाटते. तेंव्हा पत्रकारांनी बातम्या लिहितांना संबंधीत व्यक्तीचे शपथपत्र करून घेणे आवश्यक आहे असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हाजी अब्दुल सलीम हाजी अब्दुल मनान सौदागर यांनी 7 जुलै 2021 रोजी पोलीस ठाणे वजिराबाद येथे अर्धापूर येथील कोण्या शेख जाकेर शेख सगीर या माणसाविरुध्द अर्ज दिला. त्या अर्जामध्ये हाजी अब्दुल सलीम यांचा मुलगा रियान सौदागर विरुध्द दाखल झालेल्या वजिराबाद येथील गुन्हा क्रमांक 216 बद्दल नमुद केलेले आहे. या अर्जात कोण्या शेख जाकेर शेख सगीरने या गुन्ह्यात हाजी अब्दुल सलीम, त्यांची दोन मुले अफशान व अफनान या दोघांना आरोपी करण्याबद्दलचा अर्ज दिलेला होता. त्या अर्जाला प्रतिउत्तर देतांना हाजी अब्दुल सलीम यांनी 7 जुलै रोजी दिलेल्या अर्जाची आणि प्रत्यक्ष सांगितलेल्या शब्दांची बातमी नांदेड टुडे लाईव्ह न्युज चॅनल आणि वास्तव न्युज चॅनलने 8 जुलै रोजी प्रसारीत केली होती. या अर्जाचा मथळा राज्यभर अर्जाचा धंदा उभारणाऱ्या शेख जाकीरला आवर घाला-हाजी अब्दुल सलीम सौदागर असा होता. वास्तव न्युज लाईव्हमध्ये अर्जाच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीर विरुध्द आरोपींच्या वडीलांचा अर्ज असा मथळा होता.
त्याबातमीमध्ये हाजी अब्दुल सलीम हाजी अब्दुल मनान सौदागर यांनी पोलीस ठाणे वजिराबादमध्ये दिलेल्या अर्जाची पोच पावती आणि त्यांनी प्रत्यक्षात सांगितलेल्या शब्दांना आकार देण्यात आला होता. 8 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस ठाणे अर्धापूर यांनी शेख जाकेर शेख जगीर (30) व्यवसाय(धंदा) माहिती अधिकारी संरक्षण समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष रा.बरकतपुरा अर्धापूर जि.नांदेड या माणसाच्या तक्रारीवरुन नांदेड टुडे न्युज लाईव्हचे संपादक मुनवर खान नांदेड , नांदेड टुडे न्युज लाईव्हचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल नांदेड आणि वास्तव न्युज चॅनलचे संपादक कंठक सुर्यतळे यांच्याविरुध्द अदखल पात्र गुन्हा क्रमांक 193/2021 कलम 501, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस अंमलदार पी.जे.चव्हाण यांच्याकडे आहे.
हा अदखल पात्र गुन्हा दाखल होताच पी.जे.चव्हाण यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 प्रमाणे या अदखल पात्र गुन्ह्यातील कांही आरोपींना नोटीस जारी केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 149 प्रमाणे दिलेल्या नोटीसीमध्ये पोलीसांनी सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी व शांतता कायम राखावी असे लिहिले आहे. कलम 501 मध्ये असे लिहिलेले आहे की, जो कोणी एखादे साहित्य कोणत्याही व्यक्तीला अब्रु नुकसानी कारक आहे हे माहित असतांना किंवा तसे समजण्यास सबळ कारण असतांना असे साहित्य छापील किंवा कोरील तर तो 501 प्रमाणे गुन्हेगार होतो.
नांदेड टुडे न्युज लाईव्हने आणि वास्तव न्युज लाईव्हने आपल्यावतीने कांहीच छापलेले नाही. हाजी अब्दुल सलीम हाजी अब्दुल मन्नान सौदागर यांचा अर्ज आणि त्यांनी सांगितलेले शब्द यास बातमी बनवली आहे. त्यामुळे अब्रु नुकसान करण्याचा न्युज चॅनलचा कांहीही संबंध नाही आणि बातमी लिहिल्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होते असे अर्धापूर पोलीसांनी म्हणणे हा एक नवीन हास्यास्पद प्रकार आहे. यामुळे आता पत्रकारांनी बातमी लिहितांना त्या व्यक्तीकडून सक्षम प्राधिकाऱ्यासमक्ष तयार केलेले शपथपत्र घेवूनच बातमी लिहावी लागेल असे दिसते.
भारतीय दंड संहितेच्या कलम 499 ते 502 ही कलमे अबु्र नुकसानीसाठी आहेत. त्यातील भरपूर बाबींना संरक्षण सुध्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा अनेक निवाडे या कलम 499 ते 502 साठी दिलेले आहेत. तरीपण बातमी लिहिल्यानंतर माझी अबु्र नुकसानी झाली याचा फायदा भारतीय कायद्यामध्ये घेतला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हाजी अब्दुल सलीम यांनी केला आणि अर्ज दिला आणि त्या अर्जाचे सार्वजनिक स्वरुप बातमीच्या माध्यमाने करण्यात आले. त्यामुळे हा गुन्हा दाखल करून अर्धापूर पोलीस कोणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.
ही पण बातमी वाचा….
अर्जांच्या माध्यमातून ‘धंदा’ करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीर विरुध्द आरोपीच्या वडीलांचा अर्ज