मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड शहरातील शनि मंदिराजवळ एका ऑईल मीलमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांनी तेथे झोपलेल्या 62 वर्षीय वॉचमनचा खून करून त्याचे प्रेत जाळून टाकल्याचा प्रकार आज दि. 16 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला आहे. खून करणारा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.
मुखेड शहरातील शनि मंदिराजवळ महेश ऑईल मील आहे. या ऑईल मीलमध्ये 15 जुलैच्या रात्री कधी तरी चोरटा घुसला, त्याचा उद्देश चोरी करण्याचा होता. पण आतमध्ये वसंत व्यंकटी पोतदार (62) हे वॉचमन झोपलेले होते. त्यांनी 11 वाजता मीलच्या गेटला कुलूप लावले आणि झोपी गेले. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने गेटचे कुलूप तोडून आत आले तेव्हा झालेल्या आवाजाने वॉचमन वसंत पोतदार यांना जाग आली आणि त्यांना उठलेले पाहून हातातील लोखंडी रॉडने त्यांच्यावर जोरदार वार केले त्यांचा तेथेच मृत्यू झाला. त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून त्यातून 15 हजार रूपये रोख रक्कम लंपास केल्याची माहिती मिळते आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चोरट्यांनी वॉचमन वसंत व्यंकटी पोतदार यांचा मृतदेह गादीत गुंडाळला आणि त्याला आग लाऊन दिली.
ऑईल मीलमधून धूर निघत असल्याचे पाहून रात्री 4 वाजेच्या सुमारास लोकांनी ऑईल मीलचे मालक गोपाळ पत्तेवार यांना धूर निघत असल्याची माहिती सांगितली. त्यानुसार मालक पत्तेवार आले आणि त्यांनी ही घटना पोलिसांनी कळवली. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि काही आरोपींना ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यातील आरोपी हा अल्पवयीन, विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. आरोपीविरूद्ध खुनाच्या कलमासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी घडलेली ही घटना झाल्यावर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे, कमलाकर गड्डीमे, पोलीस उपनिरीक्षक गणपती चित्ते, गजानन काळे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, मारोती तेलंगे, दत्तापल्ले, महेंद्रीकर, गंगाधर चिंतोरे, किरण वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, आडबे, शिंदे, चव्हाण यांनी अत्यंत जलदगतीने तपास करून यातील मारेकरी मुखेड येथील 17 वर्षीय बालकाला ताब्यात घेतले आहे. चोरलेले 15 हजार रूपये आणि खून करण्यासाठी वापरलेली गजाळी पोलिसांनी जप्त केली आहे.
