भारतीय संविधानानुसार कायद्यासमक्ष सर्व जण एक समान
नांदेड(प्रतिनिधी)-उर्दु घराचे उद्घाटन करणाऱ्या आयोजन प्रमुखासह उद्घाटक आणि उर्दु घर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांविरुध्द कोविड नियमावलीचे उल्लंघन केले म्हणून ऍड. अनुप आगाशे यांनी पोलीस ठाणे इतवारा येथे अर्ज दिला आहे.
दि.14 जुलै रोजी देगलूर नाका परिसरातील उर्दु घर या शासकीय वास्तुचे उद्घान झाले. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.विपीन हे होते. या कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक, सामाजिक न्यायमंत्री विश्र्वजित कदम, आ.अमरनाथ राजूरकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ.मोहन हंबर्डे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, माजी मंत्री नसीम खान, माजी आ.डी.पी.सावंत, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.
ऍड. अनुप श्रीराम आगाशे यांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की, कोणत्याही कार्यक्रमाला 50 लोकांपेक्षा जास्त उपस्थिती नसली पाहिजे, मृत्यू कार्यक्रमात 20 लोकांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही असे आदेश काढून स्वत:च आदेशाल फाटा देणाऱ्या आयोजकांसह उपस्थित सर्वांवर कार्यवाही व्हावी. 4 वाजल्यानंतर कार्यक्रम घेता येत नाही असा नियम आहे तरी पण हा कार्यक्रम सुरू राहिला. या ठिकाणी पोलीसांनी बघ्याची भुमिका घेतली. भारतीय संविधानामधील परिच्छेद क्रमांक 14 प्रमाणे कायद्यापुढे सर्व समान आहेत. म्हणून उर्दु घरच्या कार्यक्रमाचे आयोजन, उद्घाटक व इतर उपस्थित सर्वांविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारा अर्ज ऍड. अनुप आगाशे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिला आहे.
