क्राईम

पेट्रोलपंप व्यवस्थापकाला लुटणारे 7 दरोडेखोर 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड परिसरातील शहिद पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला लुटून त्याच्याकडील 8 लाख 43 हजार 160 रुपये लुटणाऱ्या 7 जणांविरुध्द सोनखेड पोलीसांनी आज त्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे वाढविली. लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एम.गायकवाड यांनी या सात जणांना 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. या प्रकरणातील रामा पवार आणि लक्की उर्फ लक्ष्मण मोरे या दोघांचा शोध घेणे बाकी आहे.
दि.10 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास जानापुरी ते वडेपुरी जाणाऱ्या रस्त्यावर शहीद दिलीप केंद्रे पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक नागनाथ शेषराव केंद्रे हे 8 लाख 43 हजार 160 रुपये बॅंकेत भरण्यासाठी जात असतांना जानापूरीच्या कमानीपासून 500 ते 700 मिटर अंतरावर त्यांची लुट झाली. 9 जुलै रोजी स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणातील राजू सत्यम जाधव(24), रा.गोविंदनगर नवीन वळण रस्ता नांदेड, नागेश पोचिराम गायकवाड (19) रा.नवीन वळणरस्ता नांदेड, अमोल बालाजी जाधव (27) रा.मुगट ता.मुदखेड, जितेश बाबूराव ढगे (20) रा.होटाळा ता.नायगाव, माधव गणपत देवकर(23) रा.घुंगराळा ता.नायगाव आणि आकाश पंढरीनाथ पवळे (20) रा.जानापुरी ता.लोहा या 7 जणांना पकडले.
10 जुलै रोजी सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनी या सात जणांना अटक केली आणि 11 जुलै रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज 15 जुलै रोजी पोलीस कोठडी संपल्यावर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.आज पोलीसांनी भारतीय दंड संहितेची कलमे 395 आणि 397 ची वाढ करण्याचे पत्र न्यायालयाला दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामा पवार आणि लक्की उर्फ लक्ष्मण मोरे यांचा शोध घेणे आहे यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती सरकारी वकील ऍड. गिरीश मोरे यांनी केली. न्यायाधीश व्ही.एम.गायकवाड यांनी या दरोडेखोरांना 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *