नांदेड(प्रतिनिधी)-खटल्यांतील पुराव्यांचा अशक्तपणा आणि तक्रारदाराला लाचेची रक्कम पेरण्यासाठी असलेली संधी नाकारता येणार नाही अशा दोन कारणांसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायाधीश के.एन.गौतम यांनी तत्कालीन विमानतळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पिसे 70 हजारांची लाच घेतल्याच्या आरोपातून मुक्तता केली आहे.
नागनाथ बजरंगराव वानखेडे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 4 ऑक्टोबर 2014 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक आणि सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय मारोती पिसे हे 1 लाखांची लाच मागणी करत आहेत. नागनाथ वानखेडे विरुध्द असलेल्या गुन्ह्यांमधील तिव्रता कमी करण्यासाठी दोन महिन्यापासून हा लाच मागणीचा प्रकार सुरू होता असे तक्रारीत लिहिले आहे. नागनाथ वानखेडेची एक चार चाकी गाडी संजय पिसेने पोलीस ठाणे विमानतळ येथे नेवून लावली होती आणि त्यानंतर 1 लाखांची लाच मागणी केली होती. ही लाचेची दुसरी मागणी होती. 4 ऑक्टोबर रोजी लाचेचे 70 हजार रुपये घेवून नागनाथ वानखेडे आला नाही म्हणून हा लाच सापळा 5 ऑक्टोबर 2014 रोजी ठरला. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक संजय कुलकर्णी यांनी या लाच सापळ्याचे नियोजन केले आणि तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक संजय पिसेला अटक झाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संजय पिसे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात हा खटला विशेष न्यायालयात विशेष प्रकरण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंबर 14/2015 या प्रमाणे चालला. या खटल्यात चार साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. खटला दाखल करतांना त्यात राहिलेल्या त्रुटी या संदर्भाने वरिष्ठ न्यायालयांचे अनेक निवाडे या खटल्यात सादर करण्यात आले. ज्या दिवशी लाच सापळा रचला गेला त्या दिवशी संजय पिसेच्या टेबल ड्राव्हरमध्ये लाचेचे पैसे सापडले. संजय पिसेच्या हातात अट्राव्हायलेट किरणांमध्ये दिसणारे पावडरचे नमुने सापडले नाहीत. तक्रारदार नागनाथ वानखेडेला संजय पिसेच्या टेबल ट्राव्हरमध्ये लाचेचे पैसे पेरण्याची संधी होती या सर्व बाबींना लक्ष करत न्यायाधीश के.एन.गौतम यांनी सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या संजय मारोती पिसे यांची या प्रकरणातून मुक्तता केली आहे. या खटल्यात संजय पिसे यांच्यावतीने ऍड.एस.जी.सोनारीकर यांनी काम पाहिले.
