नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सुरू असलेल्या पर्जन्यमानाच्या अनुषंगाने विष्णुपूरी धरणातील पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेडच्या पुढे नदी काठी राहणाऱ्या जनतेने काळजी न करता दक्षता ठेवण्याची गरज आहे.
गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. विष्णुपूरी धरणाच्या मागच्या बाजूला गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पात येणारा पाण्याचा येवा वाढत आहे. आज 14 जुलै रोजी विष्णुपूरी धरणातील पाण्याची पातळी 354.95 मिटर झाली आहे. विष्णुपूरी धरणातील पाण्याचा साठा 99.04 टक्के आहे. त्यामुळे धरणातील गेट क्रमांक 6-7-13-14-18 असे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. त्यातून 2260 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातून वाहणारी गोदावरी नदी आज दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या पुर्वभागात गोदावरी नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांनी आपली दक्षता स्वत: घेणे गरजेच आहे. शहरातील संत दासगणु पुलाच्या खालून वाहणारे पाणी आता पुलाला चिटकण्यापासून फक्त कांही फुट अंतरावर आहे. एकूण 79810.00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
अनेक लोकांची घरे, शेत शिवार, गोठे, विटभट्टया या सर्व नदीकाठी आहेत. त्यामुळे जनतेने पाण्याचा प्रवाह लक्षात घेता त्यापासून दुर राहणे आवश्यक आहे. आज सकाळपासूनच पाऊस पुन्हा सुरू आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पातील दरवाजे जास्त संख्येत उघडले गेले तर पाण्याचा विसर्ग जास्त वेगाने वाढेल आणि त्यामुळे नदीकाठी वसलेल्या जनतेला होणारा त्रास लक्षात घेता जनतेने अत्यंत दक्षपणे राहण्याची गरज आहे.
