नांदेड

उर्दु घराचे नाव आता दिलीपकुमार उर्फ युसूफ खान यांच्या नावे-नवाब मल्लीक

उर्दु घराचे उद्‌घाटन संपन्न 
नांदेड(प्रतिनिधी)-दख्खन (दक्षीण) ने उर्दु भाषेला बोली भाषेची ओळख करून दिली आणि भारताच्या सार्वनिक उपयोगाची किंमत मिळवून दिली.सोबतच नांदेडच्या उर्दु घराचे नाव आता दिलीपकुमार उर्फ युसूफ खान असे असेल असे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री ना.नवाब मलीक यांनी जाहिर केले.
आज नांदेड येथे महाराष्ट्रातील पहिल्या उर्दु घराचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ना.नवाब मल्लीक बोलत  होते. व्यासपीठावर ना.डॉ.विश्र्वजित कदम, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंंबुलगेकर, उपमहापौर मसुद अहेमद खान,  आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, अल्पसंख्याक विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह अनेक नगरसेवक यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना ना.नवाब मल्लिक म्हणाले उर्दु ही लष्कराची भाषा आहे. भारतात जगातील अनेक बोली भाषा बोलणाऱ्या लोकांचे आगमन झाले आणि त्यातून उर्दु भाषा ही बोली भाषा आणि कामकाजाची भाषा तयार झाली. लष्करी भाषा असली तरी त्यातील महत्वाचे शब्द हे अत्यंत आनंद देणारे आहेत. दख्खनने भारतात उर्दु भाषेला स्थान प्राप्त करून दिले. भारतात बोली भाषेमध्ये उर्दु भाषा क्रमांक 2 वर आहे. देशात सर्वात जास्त उर्दु शाळा महाराष्ट्रात आहेत. नागपुर  आणि मालेगाव येथे उर्दु घर तयार आहेत पण पहिले उद्‌घाटन नांदेडचे झाले आहे. मराठी भाषेसह इतर भाषांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे उर्दुघर देण्यात यावे. जेणे करून भाषेची देवाण-घेवाण तयार होईल. हैद्राबादमध्ये असलेल्या मौलाना आझाद मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र नांदेडच्या उर्दुघरमध्ये तयार करून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना शिक्षण देण्यात यावे असे सांगितले. मुलांचे वस्तीगृह देण्यासाठी लवकरच प्रयत्न करेल त्यासाठी 8 लाखांचे उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटूंबातील विद्यार्थ्यांला त्या वस्तीगृहात प्रवेश मिळेल. मनपा हद्दीत वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांला 35 हजार रुपये शिष्यवृत्ती आणि जिल्ह्याच्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला 30 हजार रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे सांगितले. नांदेडच्या उर्दु घराचे उद्‌घाटन झाले हे जाहिर करतांना नवाब मलीक यांनी नांदेडच्या उर्दु घराचे नाव दिलीपकुमार उर्फ युसूफ खान यांच्या नावाने तयार करण्यात येईल असे जाहिर केले.
या कार्यक्रमात बोलतांना नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, उर्दु घराचा शादीखाना (मंगल कार्यालय) होणार नाही यासाठी अत्यंत शिस्तबध्दपणे याची देखरेख होणे आवश्यक आहे. या उर्दु घरात कार्यक्रमांसाठी जागा देतांना त्यासाठी फिस आकारा, मोफतच्या जागेचे महत्व नसते असे सांगितले. राज्याच्या अल्पसंख्याक विभागाला दरवर्षी 1 हजार कोटी रुपये निधी मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यातील 100 कोटी रुपये नांदेडसाठी खर्च करा अशी अपेक्षा व्यक्त केली. दिलीपकुमारचे नाव या उर्दु घराला द्यावे अशी विनंती केली. शहरातील आणि जिल्ह्यातील इदगाह विकासासाठी सुध्दा मी काम करणार असल्याचे सांगितले. अल्पसंख्याक विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी ह्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेत पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या ही आठवण करत यापुढे आपल्या पहिल्या नियुक्तीची जागा त्या विसरल्या नसतील म्हणून नांदेडसाठी जास्त काम करतील असे अशोक चव्हाण म्हणाले.
या प्रसंगी माजी मंत्री नसीम खान म्हणाले मी या इमारतीचा पाया ठेवलेला आहे आणि आज त्याचे उद्‌घाटन करतांना आनंद होत आहे. उर्दु घर पाहिल्यावर याची भव्यता कळते. उर्दु भाषा ही एका गटाची भाषा नसून ती भाषा सर्वांची आहे. महाराष्ट्रात उर्दु अकादमीची सुरूवात डॉ.शंकरराव चव्हाण यांनी केलेली आहे असे सांगितले. याप्रसंगी ना.विश्र्वजित कदम यांनी अल्पसंख्याक बांधवांसाठी तयार करण्यात आलेल्या या भव्य वास्तूमध्ये अल्पसंख्याक बांधवांनी आपल्या कलागुणांना वाव देवून उत्कृष्ट कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.