नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोलीचे पोलीस अधिक्षक राजेश कलासागर हे बऱ्याच दिवसापासून एका प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याची संधी साधत नांदेडच्या जुगाऱ्यांनी वारंगाफाटा परिसरात आपले बस्तान बसवले आहे.
हिंगोलीचे पोलीस अधिक्षक राजेश कलासागर हे कांही महिन्यांपासून प्रशिक्षणासाठी बाहेर आहेत. या संधीचा फायदा घेत नांदेडच्या जुगाऱ्यांनी आपला व्यवसाय चालविण्यासाठी वारंगाफाटा ही जागा निवडली आहे. या ठिकाणी एक व्यापारी संकुल आहे. ज्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर एक हॉल आहे आणि या हॉलमध्ये 52 पत्यांच्या जुगाराचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये 52 पत्यांच्या जुगाराला पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी ब्लॉक केल्यामुळे त्यांना 40 किलो मिटर दुर जाऊन आपला धंदा सुरू करावा लागला आहे. वारंगा फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक असते. या वाहतुकीमुळे त्या ठिकाणी थांबणाऱ्या जुगाऱ्यांच्या वाहनाना कोणी शंकेने पाहणार नाही हा त्यामागील मुळ भाव आहे. तरी पण जुगाऱ्यांच्या वाहनतळासाठी जुगार चालकांनी एक वेगळी स्वतंत्र सोय केल्याचेही सांगण्यात आले.
नांदेड जिल्हा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या वारंगा फाटा या भागाच्या उजवीकडे गेल्यावर 10 किलो मिटरनंतर पुन्हा नांदेड जिल्हा सुरू होतो. पण वारंगा फाटा हे उच्च कोटीचे स्थान हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या अखत्यारीतले आहे. एकूणच नांदेड येथे जुगाराला पानगळीचे दिवस आल्याने आणि हिंगोलीचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर हे बाहेरगावी असल्याने जुगाऱ्यांनी आपल्या धंद्याचा नवीन फंडा वांरगा फाटा येथे सुरू केला आहे.
