लेख

‘वज्रमूठ’ हा कविता संग्रह सप्तरसांनी रंगवलेल्या कवितांनी भरला आहे

पुस्तक परिक्षण
रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड
नांदेड- प्रत्येक माणसाच्या मनात काही भावना या दबलेल्या असतात. या दबलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत माणुस त्या भावनांना जगासमोर आणत असतो. त्या भावना जगासमोर येतात तेव्हा त्या भावनांमध्ये लपलेल्या खऱ्या अर्थाला समजणे महत्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न कसबे तडवळे येथे जन्म घेतलेल्या आणि सध्या सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महेश बाळासाहेब लांडगे यांनी “वज्रमूठ’ या आपल्या कविता संग्रहाच्या माध्यमाने केला आहे. या कविता संग्रहाचे परिक्षण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
महेश बाळासाहेब लांडगे हे अत्यंत कमी सुविधा असणाऱ्या कुटूंबात जन्म घेतलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांनी कला शाखेत पदवी मिळविली, अध्यापन पदविका मिळविली आणि व्यवस्थापनात त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. सन 2005 ते 2010 या कालखंडात त्यांनी जिल्हा परिषद परभणी आणि उस्मानाबाद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. 2010 मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवडले गेले. सन 2014 मध्ये त्यांना सहायक पोलीस निरीक्षक अशी पदोन्नती मिळाली. सध्या ते राज्य गुप्त वार्ता विभाग नांदेड येथे कार्यरत आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त करणारे महेश लांडगे यांनी कधी आपल्या मनात कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याची कल्पना आणली माहित नाही. जसे आठवले, जसे सुचले, जसा वेळ उपलब्ध झाला त्यात त्यांनी कविता लिहिल्या. या कविता लिहिताना त्यांच्या मनातील प्रेम, समाजातील दु:ख, आनंद, जगण्याची कला असे अनेक रस या कविता संग्रहात त्यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून जोडत-जोडत अनेक कविता लिहिल्या. पोलीस दलात काम करताना त्यांनी कविता लिहिण्यासाठी काढलेला वेळ बहुदा त्यांनी पहिले शिक्षकी पेशा केल्यामुळे त्यांच्या रक्तात भिनला होता आणि तो भिनलेला बाणा त्यांनी शब्दांच्या रूपात कवितांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागाची परिस्थिती त्यांनी खूप सुंदररित्या आपल्या कवितांमध्ये उतरवली आहे. आपल्या ऐतिहासिक पुरूषांचा विसर त्यांना पडलेला नाही. प्रेम कसे करावे हे सुद्धा या कवित संग्रहातून वाचायला मिळते. माणुसकी हा सर्वात आवश्यक असलेला भाव त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतो. भारतीय अर्थव्यवस्था, आमच्या देशासाठी शहीद झालेल्या जवानांची व्यथा त्यांच्या शब्दांमधून उमटलेली दिसते.
महेश लांडगे यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाची प्रास्तावना करताना भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी कृष्ण कान्त उपाध्याय यांनी लिहिली आहे. यावरूनच महेश लांडगे यांच्या शब्दांच्या वजनाला तोलण्याची भरपूर मोठी क्षमता असलेल्या व्यक्तीने आपल्या शब्दांत लिहिलेली प्रस्तावना या कविता संग्रहाविषयी थोडक्यात भरपूर काही सांगते. कृष्ण कान्त उपाध्याय हे मराठी व्याकरणाचे खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी वज्रमूठ या कविता संग्रहात लिहिलेल्या शब्दांप्रमाणे त्यातील अर्थाची भव्यता सहज कळते.
आपले मनोगत व्यक्त करताना दोन शब्द या शिर्षकाखाली महेश लांडगे यांनी आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे. स्वत:च्या कन्या मृत्यूंजया आणि शिवन्या यांचा उल्लेख करत महेश लांडगे यांनी हा काव्यसंग्रह लिहिला आहे. महेश लांडगे हा काव्यसंग्रह भारत भुमिच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या शहिद जवानांना व कोरोना योद्धांना समर्पित केला आहे. यावरून देश आणि समाज यामध्ये असलेला दुरावा कमी करून दाखवला आहे. भारतीय जवान सिमेवर रात्रंदिवस आपल्या डोळ्यात तेल घालून आमचे रक्षण करतात आणि कोरोना महामारीने त्रास सुरू केल्यानंतर माणसांनी माणसांना साथ देत त्यासाठी घेतलेली मेहनत अशा दोन वेगवेगळ्या समुहांना जोडत महेश लांडगे यांनी आपल्या कविता संग्रहाचे समर्पण त्यांच्यासाठी केले आहे. यावरून कविता लिहिण्याचा त्यांचा छंद, त्यातून व्यक्त होणाऱ्या त्यांच्या भावना, त्यातून दिसणारे त्यांचे व्यतिमत्व हे सर्व त्यांनी भारतीय जवानांना आणि कोरोना योद्धांना समर्पित केले आहे.
“वज्रमूठ’ या कविता संग्रहात 105 कविता आहेत. आई आणि आजी माझी या शिर्षकांखाली लिहिलेल्या कवितांमध्ये आपल्या आजीचे वर्णन करताना ती नातवांना पाहून किती आनंदी व्हायची असा उल्लेख केलेला आहे.हा भाव व्यक्त करताना महेश लांडगे यांनी आपल्या आजीने त्यांना दिलेले आर्शीवाद माझं आयुष्य तुला लाभू दे या शब्दांत लिहिला आहे. आई या शब्दाला आपल्या शब्दांनी रूप देताना तिला अक्षर कळत नव्हतं तरी सुद्धा ती माझी आद्यगुरू होती, असे वर्णन महेश लांडगे यांनी आपल्या कविता संग्रहात केला आहे.आईबद्दल भरपूर जण लिहितात, पण महेश लांडगेंच्या शब्दांतील आई अत्यंत प्रेमळ आणि जन्मोजन्मी तीच आई लाभावी असे जाणवते. निष्पर्ण नावाच्या कवितेत झाडांच्या पानगळीतून पुन्हा नवचैतन्य कसे निर्माण होते आणि रात्रीच्या गर्भात लपलेली उद्याच्या पहाटेची चाहुल जाणवते. जगायच कस हे आपल्या कवितेतून मांडतांना महेश लांडगे यांनी कॅन्सर आणि एड्‌स सारख्या रोगांवर प्रघात केला आहे आणि त्यात सुध्दा हसत-हसत की, रडत पडत जगायच यासाठी शब्द उल्लेखीत केले आहे. ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या महेश लांडगे यांनी पोळा सण सुध्दा आपल्या कवितेतून मांडला आहे. सर्जा राजाचा त्या दिवशीचा मान लिहिला आहे. कलीयुग या कवितेतून आज पैशांच्या जोरावर गरिबांना चिरडण्याचा चाललेला धंदा त्यांनी उत्कृष्ठपणे मांडला आहे. हे सर्व होत असतांना भारतीय संस्कृती श्रेष्ठच आहे हे त्यांनी आपल्या कवितेत मांडले आहे. प्रलय या कवितेतुन सुनामी लाटांनी घातलेला थैमान त्यांनी चित्रीत केला आहे. दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणावर मी निर्भया बोलते: या कवितेतून त्यांनी समाजावर आसोड ओडले आहेत. भुक या कवितेतून अत्यंत छोट्या छोट्या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या जीवनातील भुकेची गरज आणि त्याची कारणे सांगितली आहे. पोलीस स्थापना दिवस या कवितेत जनता कशी सुरक्षीत राहील हे आपल्या शब्दातून मांडले आहे. पोलीस विभागात काम करतांना रात्रीची ड्युटी या संबंधाने महेश लांडगे यांनी लिहिलेली कालची नाईट ही कविता पोलीस विभागातील रात्रीच्या ड्युटीचे वर्णन करते. शिवरायांचा मावळा कसा असतो. त्याने काय-काय केले हे मांडतांना मावळा ही कविता लिहिली आहे. रंगानी रंगलेले ही कविता लिहितांना माणुस आणि त्यातील रंग मांडतांना त्यांनी तिरंग्याचे महत्व उल्लेखीत केले आहे. आजच्या रंगीत माणसांच्या जीवनात तिरंगा सर्वात वर आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी झाल्यावर तिच्या मातेची झालेली त्या काळातील व्यथा अखेर न्याय मिळाला या कवितेतून महेश लांडगे यांनी मांडली आहे.
कोरोना..जनता कर्फ्यु या कवितेतून कोरोनामुळे तयार झालेली परिस्थिती मांडली आहे. ऍंटीव्हायरस या कवितेतून रस्त्यावर न फिरण्या संदर्भाने सांगतांना पोलीस मात्र रस्त्यावर उभा आहे हे वर्णन केले आहे. भिम जयंती या कवितेतून आपले विचार मांडतांना अत्यंत मोजक्या शब्दात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या शब्दात मांडतांना कसे फेडावे ऋण या कवितेतुन सांगितले आहे. 107 हुताम्याच्या रक्ताने मिळालेला महाराष्ट्र मांडतांना महाराष्ट्र दिन ही कविता लिहिली आहे. चिमण्यांचा चिवचिवाट आम्ही विसरलो होतो तो पुन्हा एकदा शब्दाच्या रुपात का होईना महेश लांडगे यांनी मांडला आहे. पावसाच्या अवेळी बरसण्याच्या वृत्तीवर अवकाळी आणि वादळीवारा या दोन कविता आहेत. वाह्यात पाण्याचा खळखळाट आम्ही विसरलो होतो. महेश लांडगे यांनी पाणी या कवितेतून पाण्यामुळे कसे सुंदर अभंग ऐकायला मिळतात त्यामुळेच आपल्याला धान्य मिळते हे कवितेतुन सांगितले आहे. माणुसकी या कवितेतत महेश लांडगे यांनी ती कशी जगवायची हे सांगितले आहे. सोन्याचा गोळा या कवितेतून अस्ताकडे जाणाऱ्या सुर्याचा उल्लेख अत्यंत सुंदर केला आहे. स्मशानात जळणं.. या कवितेतून आपल्या जन्मदात्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. ही कविता त्यांना वर्तमान पत्रामध्ये छापलेल्या बातमीच्या अनुशंगाने तयार करता आली असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. परावर्तीत या कवितेतून त्यांनी प्रेम मांडले आहे.
या कविता संग्रहाला “वज्रमूठ’ हे शिर्षक आहे. त्यात आपल्या नशिबात काय लिहिले आहे हे मांडतांना मेहनत महत्वाची आहे असे लिहिले आहे. हातात रेषा नाही म्हणून नशीब बदलत नाही हा या “वज्रमूठ’ चा मुख्य भाग आहे. या कविता संग्रहात 105 कविता आहेत. मी सर्वच कवितांचा उल्लेख केला तर हा कविता संग्रह वाचण्याची वाचकांची इच्छा मी मागे पाडू इच्छीत नाही पण या कविता संग्रहातून आजच्या समाजात जगतांना आपल्याला आवश्यक अशा सर्व बाबी सुंदर शब्दांच्या मांडणीतून महेश लांडगे यांनी लिहिल्या आहेत. “वज्रमूठ’ या कविता संग्रहाचे परिक्षण लिहितांना माझ्या हातून चुका घडल्या असतील तर त्या वाचकांनी मोठ्या मनाने माफ कराव्यात अशी विनंती आहे. मी ज्ञानी नाही, विद्ववान नाही तरीपण माझ्याकडे असलेल्या शब्दसंग्रहातून महेश लांडगे यांनी केलेल्या मेहनतीला छोटेसे पाठबळ देण्याचा मी प्रयत्न केला. वाचकांनी हा कविता संग्रह जरूर वाचावा अशी विनंती आहे.
वज्रमूठ
लेखक – महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक
प्रकाशक-सनय प्रकाशन,
शुभम विश्र्व, मोगरा बी.14, आनंदावाडी,
नारायण गाव, ता.जुन्नर, जि.पुणे. पिन-410504
किंमत-130 रुपये

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *