नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात एका पेट्रोल पंप व्यवस्थापकाला लुटून त्यांच्याकडील 8 लाख 43 हजार 160 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांचा शोध स्थानिक गुन्हा शाखेने लावला आहे. सोबतच इतर दोन गुन्ह्याचा शोध सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेने लावलेला आहे. या प्रकरणी 9 गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या रक्कमेतील 1 लाख 50 हजार 700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सोबतच 50 हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
10 मे रोजी वडेपुरी ते जानापूर जाणाऱ्या रस्त्यावर शहीद दिलीपसिंघ पेट्रोलपंपचे मॅनेजर नागनाथ केंद्रे व मिलिंद लोखंडे हे जमा झालेली रोख रक्कम 8 लाख 43 हजर 160 रुपये घेवून वडेपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडे पैसे जमा करण्यासाठी जात असतांना जानापूरी ते वडेपुरी या गावादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून चाकूचा धाक दाखवून 8 लाख 43 हजार 160 रुपयांची बॅग पळवली. या बाबत भरपूर मेहनत करून सुध्दा पोलीसांना यश आले नाही तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखा पथकाने आपल्या कसबाला परिस लावून त्याची सत्यता दाखवली.
पोलीसांनी राजू सत्यम जाधव, नागेश पोचिराम गायकवाड, अमोल बालाजी जाधव, जितेश बाबूराव ढगे, रामा व्यंकटी पवार, गणेश पोतावार, गणपत देवकर, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे आणि आकाश पंढरीनाथ पवळे यांना पकडले. या 7 जणांनी त्या दिवशी ती रक्कम लुटून मुगट जवळील गायराण शेतात बसून त्याचे हिस्से केले. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार रामा व्यंकटी पवार आणि लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे हे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने या 9 जणांकडून 1 लाख 50 हजार 700 रुपये रोख रक्कम आणि 50 हजार रुपये किंमतीचे 7 मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणातील आणखी कांही गुन्हेगार पकडायचे आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने हिंगोली गेट उड्डाण पुलावर झालेल्या लुटीच्या संदर्भाचे गुन्हेगार सुध्दा पकडले होते. त्यांच्याकडून 14 लाखापैकी 4 लाख 88 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे सहकारी पोलीस अधिकारी पांडूरंग भारती, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार शाहु, गोविंद मुंडे, दशरथ जांभळीकर, गंगाधर कदम, भारत केंद्रे, मारोती तेलंग, संजय केंद्रे, पिराजी गायकवाड, सलीम बेग, संग्राम केंद्रे, सखाराम नवघरे, रुपेश दासरवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार, बजरंग बोडगे, गणेश धुमाळ, विलास कदम, रवि बाबर, बालाजी तेलंग, बालाजी मुंडे, राजू पुल्लेवार, संजय जिंकलवाड, शेख कलीम, पद्मसिंह कांबळे, बालाजी यादगिरवाड, शंकर केंद्रे, राजेश सिटीकर, महेश बडगु यांचे कौतुक केले आहे. जनतेने बॅंकेत पैसे नेतांना आणि परत आणतांना खबरदारी घ्यावी आणि सर्तकता बाळगावी असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे.
