नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात 17 दुचाकी गाड्या पकडल्याची माहिती प्रेसनोटद्वारे पोलीस अधीक्षकांसोबतच्या फोटोसह जोडून दिली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक असा शिक्का मारलेली एक प्रेसनोट प्राप्त झाली. त्यात लिहिल्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे आणि तोंडी आदेशावरून नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात श्री सुधीर चव्हाण (19), राजेंद्रसिंह बजरंगसिंह कच्छवा/ठाकूर (19) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अनिल फकिरा पवार (23), तुषार भगवान दुधमल (22), मधुकर रावसाहेब राजमोह (21) यांच्यासोबत मिळून दुचाकी गाड्यांच्या चोऱ्या केल्याचे सांगितले. वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांचे क्रमांक लिहून त्यातील पाच गाड्या जप्त झाल्या असे लिहिले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील पाच आणि इतर ठिकाणाहून चोरलेल्या दोन अशा दहा गाड्या चोरल्याची महिती लिहिलेली आहे. याच प्रेसनोटमध्ये सात दुचाकी गाड्यांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाला विचारण्यात आली आहे, असेही लिहीले आहे. नमूद प्रकरणात (म्हणजे कोणत्या) आजपर्यंत 19 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असे लिहिले आहे. प्रेसनोटसोबत जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा फोटो अधिकाऱ्यांसह पाठविण्यात आला आहे.
या दुचाकी गाड्या जप्त करण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, जाधव, मलदोडे, नागरगोजे, कवठेकर, पवार, कोळनुरे, पाटील, स्वामी, दत्ता पवार, शिंदे, रामदिनेवार यांनी या गाड्या जप्त केल्या आहेत, असे लिहिले आहे.
