धर्माबाद(प्रतिनिधी)-येथील बाळापुर शिवारामध्ये मद्य निर्मिती साठी प्रसिद्ध असलेल्या पायोनियर डिस्टलरी कंपनी लिमिटेड मध्ये आज सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग पायोनिर प्रशासनातील अग्निशामक दलाच्या सतर्कतेने आटोक्यात आल्यामुळे फार मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलल्या जात आहे.
धर्माबाद येथील बाळापुर शिवारात मद्यनिर्मितीसाठी सुप्रसिद्ध असलेली पायोनियर डिस्टिलरीज कंपनी आहे. या कंपनीत आज सायंकाळी डिस्लेशन म्हणजेच मोन्यासीस प्लांटला अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज असून तब्बल कंपनीच्या जन्मापासून 22 वर्षानंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे. ह्या मोनेसिस प्लांटच्या बाजूला वेअर हाऊस असून सर्व अल्कोहल येथे साठवल्या जाते. अवघ्या 50 मीटर अंतरावर हे वेयरहाउस असून त्यामध्ये साठवले जाणारे अल्कोहल हे अतिशय ज्वलनशील म्हणजेच पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये गणल्या जाते. जर का या आगीने रुद्र रूप धारण केले असते तर मोठमोठे स्फोट झाले असते व कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचा भाजून कोळसा झाला असता असे जाणकारांचे म्हणणे असून, ही आग आता आटोक्यात आल्याचे वृत्त आहे. पण मल्टिनॅशनल कंपनी समजला जाणाऱ्या अशा कंपनीमध्ये आग लागतेच कशी? असा प्रश्न उपस्थित होत असून यासाठी पायोनियर प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असून सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवितांचा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. या आगीच्या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देण्याचे टाळल्या जात असले तरी या आगीची उच्चस्तरीय चौकशी होऊन पायोनियर प्रशासनाच्या बेजबाबदारपणा संदर्भात शासनाने जाब विचारावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.
