नांदेड (ग्रामीण)

एसएफआय आणि डीवायएफआयची मुखेडमध्ये तीव्र निदर्शने!

नांदेड(प्रतिनिधी)-एसएफआय आणि डीवायएफआय जिल्हा कमिटीच्या वतीने आज मुखेड तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा, मुलाखती, आयोगावरील सदस्यांच्या रखडलेल्या नेमणुका विविध सेवांसाठी अर्हताप्राप्त असलेल्या लाखो उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे. तीन वर्षांपासून राज्य सेवा परीक्षा – २०१९ बरोबरच स्थापत्य अभियांत्रिकी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २९९६ पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षा रखडल्या आहेत. स्वप्नील लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येमुळे हा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे.

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. आणि या दबावामुळे त्याने आत्महत्या केली

एमपीएससी आणि सरकारच्या बेजबाबदार वर्तनाची बरीच उदाहरणे आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या ११४५ पदांसाठी जून २०१९ मध्ये पूर्वपरीक्षा, तर नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा झाली. तब्बल आठ महिन्यांनी जुलै २०२०ला मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही ३६०० उमेदवार वर्षभरापासून मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत. स्वप्नील लोणकर हा त्यापैकीच एक होता. याच काळात विद्युत उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मात्र, दोन वर्षांपासून त्यांचीही नियुक्ती रखडली आहे. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या ४३५ पशुधन विकास अधिकारीपदासाठी २२ डिसेंबर २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दीड वर्षांपासून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १३०० उमेदवारांच्याही मुलाखती घेतलेल्या नाहीत. राज्य सरकार मुलाखती, नियुक्त्यांची प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलत असल्याने निवड झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे.

एमपीएससी ही महाराष्ट्रातील सर्वात गैरव्यवस्थापित संस्था राहत आलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष मग ते कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी यावर नियंत्रण केले असले तरी ते राज्यातील तरुणांप्रती बेजबाबदारच आहेत. शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील जवळपास सर्वच विभाग कमी कर्मचारी असलेले आहेत. भरती बंदीमुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम झाला आहे.

शाळा व महाविद्यालयीन शिक्षणही धोक्यात आले आहे. खासगी शाळा पूर्ण शुल्क आकारत आहेत आणि बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांनी फी वाढविली आहे. कोरोना साथीने अनेकांची नोकरी काढून घेतली आहे आणि फी भरण्यास पालकांना त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकू नये आणि फी न भरल्यासही त्यांना परीक्षा देण्यापासून रोखू नये, असे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. परंतु ही सूचना शाळांमध्ये लागू केली जात नाही. फी दिली गेली नाही तर पालकांनाही उघडपणे धमकावले जात असल्यामुळे मुले ऑनलाइन वर्गातून बाहेर फेकले जात आहेत. घटनेतील मूलभूत हक्काचा भाग असलेल्या या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याचे हे स्पष्ट उल्लंघन आहे. खासगी शाळांमध्ये आरटीईमुळे होणाऱ्या प्रवेशांचीही यंदा तोडफोड केली जात आहे. आरटीईच्या माध्यमातून प्रवेश मिळाला असला तरी गरीब पालकांकडून फीस घेतली जात आहे.तेव्हा आम्ही पुढील मागण्या करीत आहोतआत्तापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी आणि शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार ही भरती 31 जुलै पर्यंत झाली पाहिजे, सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणारी भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींकडून आऊटसोर्सिंग बंद करावी,खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते,विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरती प्रक्रिया पुरेशा पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे,विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणार्‍या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा, खासगी शाळांमध्ये 50% फीस कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च जास्त झाला नाही, आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत याची खातरजमा सरकारने केली पाहिजे,आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीसच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे. शिष्यवृत्ती आणि स्वाधारची रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांच्य खात्यात जमा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी बालाजी कलेटवाड,विजय लोहबंदे,सुधाकर अंबुलगेकर,शंकर बादावाड, केरबा होनराव,अमोल सोनकांबळे,माधव बादावाड,अनिल पांचाळ,अंबादास कांबळे, नरसिंग सोनकांबळे,भिमराव सोनकांबळे,विकास गायकवाड,अक्षय गायकवाड,अनिकेत कांबळे,शुभम वाघमारे,आशिष गायकवाड, संदेश कांबळे,सोहेब लाला,संदिप तोटरे, मारोती कांबळे, माधव नामाटीळे,चंदू सुर्यवंश,तुकाराम सुर्यवंशी,चंद्रकांत गवलवाड आदींची उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *