भाजीपाला घेणाऱ्या पोलीसाचा मोबाईल चोरला; 3 लाख 9 हजारांचा एकूण ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी झाली आहे. धानोरा मक्ता ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 27 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्यात गाड्यांचा लिलाव सुरू असतांना एका व्यक्तीच्या खिशातून 40 हजार रुपये चोरीला गेले आहेत. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 35 हजार रुपये किंमतीची एक गाय चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 3 लाख 9 हजार 435 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
गोविंद नारायण कसबेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता ते एम.एच.26 ए.जे.2660 या गाडीवर बसून गोदमगाव ता.नायगाव येथून तुप्पाकडे येत असतांना काकांडी पेट्रोल पंपाजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी त्यांच्या गाडीसमोर गाडी अडवी उभी करून शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडून 8 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 10 हजार 90 रुपये रोख असा 18 हजार 90 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
धानोरा मक्ता ता.लोहा येथील बशीर शेख नवाब शेख यांचे घर दि.7 जुलैच्या रात्री 11 ते 8 जुलैच्या पहाटे 4 वाजेदरम्यान कोणी तरी फोडले. कपाटात ठेवलेले 65 हजार रुपये रोख रक्कमसह चांदीचे पैंजण, सोन्याची गलसर, कानातील झुमके असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज चोरला तसेच गावातील गोविंद कातुरे यांच्या घरातील 57 हजार रुपये आणि वैजनाथ गायकर यांच्या घरातील 22 हजार रुपये असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक संतोष तांबे अधिक तपास करीत आहेत.
अंकुश रामजी कोल्हेवाड या पोलीसाचा मोबाईल 7 जुलै रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते वसंतनगर चौकात भाजीपाला खरेदी करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल 20 हजार 990 रुपये किंमतीचा चोरला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चांदणे अधिक तपास करीत आहेत.
अमोल मुंजाजीराव सोनकांबळे यांच्या 6 हजार 355 रुपये किंमतीचा मोबाईल श्रीनगर बसस्थानकाजवळ 8 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जुनगरे अधिक तपास करीत आहेत.
काल 8 जुलै रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दुचाकी गाड्यांचा लिलाव होता . या लिलावा दरम्यान बरीच गर्दी होती. त्यावेळी अंकुश आनंदा खुळे यांच्या खिशातील 40 हजार रुपये कोणी तरी चोरले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गोणारकर अधिक तपास करीत आहेत.
सदाशिव चंपतराव मोरे यांची सोनखेड शिवारातील जय मल्हार धाब्याजवळ असलेल्या शेतातून 5 जुलै च्या रात्री 11 ते 6 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान 35 हजार रुपये किंमतीची गाय कोणी तरी चोरून नेली आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
