नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 मध्ये किनवट शहरात प्रा.सुरेखा राठोड यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. तथाकथित अनेक मोठ-मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि 5 जणांविरुध्द सुरेखा राठोड खून प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात अटक मात्र तीन लोकांना झाली होती. दोन फरार या सदरात दाखवून दोषारोपपत्र दाखल झाले होते. त्यातील पती-पत्नी असणाऱ्या दोन जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. दोषमुक्तीच्या आदेशात न्यायालयाने पोलीसांच्या अभिलेखाचा भरपूर समाचार घेतलेला आहे. तपासाची कोणतीही दिशा नव्हतीच असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
23 ऑक्टोबर 2018 रोजी किनवट शहरात नामांकित शाळेच्या प्राचार्य सुरेखा राठोड यांचा गळाचिरुन खून करण्यात आला. सुरूवातीच्या काळातील पुरावे जमा करणे, तक्रार दाखल करणे, पंचनामे करणे आणि साक्षीदार जमवणे यामध्ये अनेक मातब्बर तथाकथीत हुशार पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सत्यानाश कसा केला हे उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांनी दिलेल्या दोन जणांना दोषमुक्तीनंतर दिसले. आपली बहिण सुरेखा राठोड हिचा खून झाल्याची तक्रार तिचा बंधू विलास दामोधर राठोड याने दिली होती. त्यात प्राचार्य सुरेखा राठोड यांचा नवरा विजय टोपा राठोड,अजय असोलेकर, वैशाली शेषराव माने, तिचा नवरा प्रा.शेषराव सुभाष माने यांना आरोपी करण्यात आले होते. त्या गुन्ह्याचा क्रमांक 191/2018 असा होता.
या प्रकरणात पोलीसांनी भारतीय दंडसंहितेची कलमे 120(ब), 201,302, 506 आणि 34 नुसार दोषारोप पत्र दाखल केले. ज्या चार आरोपींविरुध्द दोषारोप पत्र दाखल झाले. त्या चौघांपैकी कोणी तरी सुरेखा राठोड यांचा गळा चिरला आणि त्यांचा खून केला. याचा एकही पुरावा दोषारोपपत्रात नव्हता. पकडण्यात आलेल्या सर्वांविरुध्द पोलीसांनी कटरचणे अर्थात कलम 120(ब) प्रमाणे पुरावा जमवला होता. अटक झाली तेंव्हा वैशाली माने ह्या गर्भवती होत्या. तुरूंगातून त्यांनी एमफिल अर्ज भरून एमफिल सुध्दा प्राप्त केले.
जिल्हा न्यायालयात सत्र खटला क्रमांक 137/2018 मध्ये दोन वेगवेगळ्या अर्जांनुसार शेषराव सुभाष माने आणि वैशाली शेषराव माने यांना आपल्याला दोषमुक्त करण्याची मागणी केली. यामध्ये दुसरे अतिरित सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी शेषेराव सुभाष मानेला दोषमुक्त केले. हा आदेश लिहितांना न्यायालयाने पोलीसांनी वैध वैज्ञानिक प्रयोग शाळेतील पुरावा, वैद्यकीय पुरावा, थेट अथवा परिस्थितीजन्य पुरावा असा कोणताच अभिलेख या संदर्भाने तयार केला नाही ज्या कारणावरुन शेषराव मानेला या प्रकरणातील दोषी मानता येईल असे म्हटले आहे. सोबतच कलम 201 चे पुरावेत तर मिळतच नाहीत. कलम 216 चे पुरावे सुध्दा दोषारोपपत्रात दिसत नाहीत अशी नोंद करून शेषराव सुभाष मानेला दोषमुक्त केले होते. त्यासोबतच वैशाली शेषराव मानेचा स्वतंत्र अर्ज मात्र फेटाळण्यात आला होता.
वैशाली मानेने या निकालाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती आर.जी. आवचट यांच्या समक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. आपला निकाल देतांना न्यायमुर्तींनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील दोषारोप मुक्तीचे कलम 227 लिहिले आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयातील योगेश उर्फ सचिन जगदीश जोशी विरुध्द महाराष्ट्र शासन या निर्णयाचा उल्लेख केला. वैशाली माने बाबत लिहितांना न्यायालयाने अनेक साक्षीदारांचे नाव नमुद करून त्यांनी दिलेल्या साक्षीत काय आहे याचा उल्लेख केला आहे. उच्च न्यायालयाला सुध्दा याप्रकरणात वैशाली मानेने प्राचार्य सुरेखा राठोड यांचा खून केल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याची नोंद करत वैशाली मानेला सुध्दा सुरेशा राठोडच्या खून प्रकरणातून मुक्त केले आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी वैशाली मानेची बाजू ऍड. सतेज जाधव यांनी मांडली त्यांना ऍड. एम.ए.ग्रंथी यांनी सहकार्य केले.
भारतीय दंडसंहितेच्या कलम 302, 120 (ब) सह इतर कलमान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात सर्वात महत्वाचा प्रश्न प्राचार्य सुरेखा राठोड यांचा गळा कोणी चिरला हे शोधणे आवश्यक होते आणि नेमका हाच शोध पोलीसंाना लावता आला नाही. तत्कालीन स्थानिक गुन्हा शाखेतील एकसे बढके एक असे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार 8-8 दिवस किनवटमध्ये राहिले आणि काय केले ते देवालाच माहित. याप्रकरणातील सुरेखा राठोड यांचा नवरा विजय राठोड हा सध्या तुरूंगात आहे. दोन जणांना दोषमुक्ती मिळाली आहे, तिसरा दोषमुक्ती मागत आहे. महाराष्ट्र पोलीस तपास प्रक्रियेत सर्वात अग्रणी असते या शब्दांना न्यायालयातील या निर्णयामुळे खोच लागली आहे. सुरेखा राठोड प्रकरणाचे मारेकरी सापडलेच नाहीत आणि अशा पध्दतीने आज तीन वर्षानंतर सुध्दा प्राचार्य सुरेखा राठोड यांना न्याय मिळाला नाही हे मात्र सत्य आहे.
