नांदेड (प्रतिनिधी)-अर्जांच्या माध्यमातून “धंदा’ करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरपासून वाचवावे अशा आशयाचा अर्ज फे्रंडर्स जर्दा स्टोअरच्या मालकाच्या वडीलांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथे दिला आहे.
दि.5 जुलै रोजी फें्रडर्स जर्दा स्टोअरवर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकली त्या ठिकाणी प्रतिबंधीत असलेला गुटखा सापडला. त्या गुटख्याची किंमत 3 लाखांपेक्षा जास्त आहे. त्या दुकानाचा मालक रेहान हाजी अब्दुल सलीम सौदागर हा आहे. या बाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात रेहान सौदागिर विरुध्द गुन्हा क्रमांक 216/2021 दाखल झाला. दि.6 जुलै ते 8 जुलै या दोन दिवसासाठी न्यायालयाने रेहान सौदागरला पोलीस कोठडीत पाठविले होते.
दि.6 जुलै रोजी अर्धापूरच्या शेख जाकीर शेख सगीर नावाच्या व्यक्तीने वजिराबाद पोलीस ठाण्यात अर्ज दिला आणि त्यानुसार गुन्हा क्रमांक 216 मध्ये हाजी अब्दुल सलीम हाजी अब्दुल मन्नान सौदागर, त्यांचे दोन पुत्र अफशान उर्फ मोहसीन सौदागर आणि अफनान सौदागर अशा तिघांना गुन्हा क्रमांक 216 मध्ये आरोपी करावे अशी मागणी त्या अर्जात केली.
वजिराबाद पोलीसांनी अफशान सौदागरला बोलावून शेख जाकीर शेख जगीरने दिलेला अर्ज दाखवला. त्याबद्दल त्याचा जबाब नोंदवून घेतला. सोबतच हाजी अब्दुल सलीम सौदागर आणि दुसरा मुलगा अफनान सौदागर यांनाही बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले.
यानंतर 7 जुलै रोजी हाजी अब्दुल सलीम हाजी अब्दुल मन्नान सौदागर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात अर्ज दिला की, माझ्या दुकानाचा व्हिडीओ काढून भारतीय संविधानाने दिलेल्या माझ्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरची चौकशी करावी. शासनाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरुन दुकानाचा मालक, माझा मुलगा रेहान सौदागर विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. कोणत्या भारतीय कायद्याप्रमाणे शेख जाकीरला हा अर्ज देता येतो अशी विचारणा केली आहे. कायद्याच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या कामात दखल देणे आणि आपली तुंबडी भरून घेणाऱ्या आणि अर्जांच्या माध्यमातून “धंदा’ करणाऱ्या शेख जाकीरविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली.या संदर्भाने प्रत्यक्षात विचारले असतांना हाजी अब्दुल सलीम सौदागर म्हणाले नांदेड जिल्हाच नव्हे तर राज्यभर या शेख जाकीर शेख सगीरने अर्जांच्या नावावर धंदा सुरू केलेला आहे. हा धंदा बंद करण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेण्याची गरज आहे.
