नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या 6 दुचाकी गाड्या, लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्या दोन दुचाकी गाड्या, वसमत येथून चोरीला गेलेली एक दुचाकी गाडी अशा 3 लाख 2 हजार रुपये किंमतीच्या 9 दुचाकी गाड्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून जप्त केल्या आहेत. यात त्यांचे दोन साथीदार अद्याप पकडणे आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी दुचाकी चोरी करणाऱ्या कांही लोकांना पकडून आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हा शाखेला केल्या. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आकाश आनंदा बादवड रा.विठ्ठलनगर पावडेवाडी नांदेड आणि बलबिरसिंग प्रतापसिंग जाधव रा.नांदेड अशा दोघांना पकडले. यातील आकाश आनंदा बादवड याने त्याचा सहकारी बलबिरसिंघ जाधव सोबत मिळून वसमत, लिंबगाव आणि भाग्यनगर येथून चोरी केलेल्या 1 लाख रुपये किंमतीच्या तीन गाड्या पोलीसांना दिल्या आहेत. आकाश बादवडने दुसरे साथीदार गोविंद शर्मा आणि शेख नदीम शेख जलील अशा तिघांनी मिळून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी गाड्या आणि लिंबगाव येथून एक अशा चोरी केलेल्या सहा दुचाक्या 2 लाख 2 हजार रुपयांच्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यातील 6 गाड्या स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केल्या आहेत.
पकडलेल्या बलबिरसिंग प्रतापसिंग जाधवला लिंबगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच आकाश आनंदा बादवड भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी चोरट्यांना पकडणाऱ्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, कक्ष क्रमांक 11 चे साहेब क्रमांक दोन गोविंद मुंडे, गुंडेराव करले, पिराजी गायकवाड, संग्राम केंद्रे, अफजल पठाण, बजरंग बोडके, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, बालाजी मुंडे, गजानन बैनवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगिरवाड, रवि बाबर आणि अर्जुन शिंदे यांचे कौतुक केले आहे.
