नांदेड (ग्रामीण)

मेळगावचे सरपंच व एक महिला सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ

नायगाव (प्रतिनिधी)-बलात्कार प्रकरणात जेलमध्ये असलेले मेळगावचे सरपंच व अतिक्रमण केल्या प्रकरणी एका महिला सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवण्याचा निर्णय (ता. ५) रोजी दिला असल्याने खळबळ उडाली असून. सदर प्रकरणी विनोद शिंदे यांनी पुराव्यासह तक्रार दाखल करुन पाठपुरावा केला होता.
नायगाव तालुक्यातील मेळगावची ग्रामपंचायत निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिण्यात मेळगावच्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडी झाल्या होत्या. सरपंचपदी अमोल रामानंद महिपाळे यांची निवड झाली होती तर सौ. चंद्रकला प्रदीप धसाडे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. निवडणुकीत वादविवादानंतर हाणामारीचाही प्रकार घडला होता.
सरपंच अमोल महिपाळे याने सार्वजनिक जीवनात वावरताना लज्जास्पद काम केले असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर गुन्हा नोंद असून. सौ. चंद्रकला प्रदीप धसाडे यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे या दोघांनाही अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी विनोद आनंदराव शिंदे यांनी
करुन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. या वस्तुनिष्ठ तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर चौकशी करून अहवाल पाठवण्याचे आदेश गटविकास अधिकारी नायगाव यांना दिला होता.
पंचायत समितीच्या प्रत्यक्ष स्थळ पाहाणीत अतिक्रमण झाले असल्याचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे प्रतिवादी यांच्या विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) नुसार दाखल केलेला विवाद अर्ज मंजूर करण्यात आला असून ग्रामपंचायत सदस्या सौ. चंद्रकला प्रदीप धसाडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेवर अनाधिकृत अतिक्रमण केल्याचे सिध्द होते. त्याचबरोबर सरपंच अमोल महिपाळे यांच्या बाबतीत गटविकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव यांनी ता. १७ मे रोजी अहवाल सादर केला. त्यात अमोल रामानंद महिपाळे रा. मेळगाव यांचे शौचालय असून त्यांचे बांधकाम नुकतेच केलेले दिसुन येते. तसेच त्याचा नियमित वापर होत नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रा.प. अधिनियम १९५८ चे कलम १४ ज (५) चा भंग होतो. असा अहवाल या कार्यालयास सादर केला आहे.
तक्रारदारंनी केलेला युक्तिवाद व गटविकास अधिकारी नायगाव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी नांदेड यांनी ता. ५ रोजी निर्णय दिला असून. ग्रामपंचायत सदस्या सौ. चंद्रकला प्रदीप धसाडे व सरपंच अमोल महिपाळे यांना अपात्र ठरवून अनर्ह ठरवले आहे. या निर्णयाची माहिती समजताच मेळगाव येथे एकच खळबळ उडाली असून. अपात्र सरपंच सध्या जेलमध्ये आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *