धर्माबाद शेजारच्या तानूर मंडळातील घटना
धर्माबाद (प्रतिनिधी)- येथून अवघ्या 10 ते 12 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्यातील तानुर मंडल मधील मौजे शिंगणगाव येथे आज सकाळी मोठा हादसा झाल्याचे उघडकीस आले असून गावानजीक असलेल्या तलावात तीन तरुणींचे मृतदेह सापडले. यामुळे एकच खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे.
धर्माबाद शहरापासून बन्नाळी मार्गे तेलंगणा राज्यातील तानुर शहरापासून मुधोळ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिंगणगाव हे एक खेडेगाव असून या गावांमध्ये तीन तरुण मुली काल दुपारी तळ्याकाठी फिरायला गेल्याचे वृत्त असून सेल्फी काढण्याच्या नादामध्ये त्यांचा तलावांमध्ये तोल जाऊन बुडून दुर्दैवी अंत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. ही घटना काल सायंकाळी घडली असावी. कारण आपल्या मुली दुपारपासून बेपत्ता आहेत असे पालकांचे म्हणणे होते. ही घटना आज सकाळी 11 वाजता उजेडात आली. मृत्त तरुणींची ओळख पटली असून सुनिता वय वर्ष 16, वैशाली वय वर्षे 14, व अंजली वय वर्षे 14 हे ओळख पटलेल्या तरुणींचे नाव असून, सुनिता आणि वैशाली या सख्ख्या बहिणी असून अंजली ही त्यांची बोधन मंडळ मधील रक्तनात्यांची नातलंग असल्याचे कळते. सदरील निरागस तीनही तरुणींचे मृतदेह तलावातील पाण्याबाहेर तरंगताना दिसले. यावेळी गावकऱ्यांनी तानुर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून पोलीस निरीक्षक राजन्ना हे घटनास्थळावर दाखल झाले. गावक-यांच्या साथीने तीनही तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पण ही घटना धक्कादायक असून ही हत्या तर नाही ना? अशी शंका उपस्थितांनी व्यक्त केली. मृतदेहाचा पंचनामा करून नातलगाच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास पी.एस.आय. राजन्ना हे करीत असून शिंगणगावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
