नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात काम करणाऱ्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी विविध संकेतस्थळांवर शिव्या खाण्याची तयार असेल तरच वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करावी नसता तुमची नोकरी जाणार नाही फक्त वरिष्ठ साहेब रागवेल. रागवेल तर रागवेल तो तर कुटूंब प्रमुख आहे. आपल्या कुटूंबातील चुकलेल्या माणसांना रागवणे त्याचा अधिकार आहे, असाच एक प्रकार वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर लिहिण्यासाठी योग्य आहे.
वाहतुक शाखा क्रमांक 1 चे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी दि.2 जुलै रोजी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.डब्ल्यू.0292 वर मोटार वाहन कायद्याच्या अनुशंगाने त्या वाहनात केलेल्या बदलासाठी कार्यवाही केली. त्याचा चालन क्रमांक एनएएनसीएम 21008215806 असा आहे. या गाडीचे मालक दिपक दत्तात्रय सल्लावार रा.लोहारगल्ली बिलोली जि.नांदेड हे आहेत. दिपक सल्लावारने आपल्यावर लावण्यात आलेला दंडाची पावती फेसबुक पेजवर लावली ही पावती किरण कोकरे नावाच्या एका व्यक्तीने नांदेडकरांचा कट्टा या फेसबुक गु्रपवर लावली आणि त्यावर चंपक भाकरे याने कॉमेंटस् केले. भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. पण त्याच्या मर्यादा विसरून बोलले तर गुन्हा दाखल होत असतो आणि या प्रकरणातही असेच झाले आहे.
ज्या वाहनावर कार्यवाही करण्यात आली ते वाहन वाहनतळात उभे होते. म्हणून दम असेल तर चालू गाडीवर कार्यवाही करा. सोबतच वाहतुक निरिक्षकाची बदली तात्काळ करा. त्यांना चपलीचा हार घालून सत्कार करतो. सर्व दलाल लोकांचा या शब्दांसह उध्दार करण्यात आला आहे. चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांना पण धुऊन काढण्याची क्षमता आहे मग पोलीसच काय असे शब्द लिहिले आहेत.
हे शब्द वाचल्यानंतर काल दि.5 जुलै रोजी चंद्रशेखर कदम यांनी त्या फेसबुक पेजचे प्रिंटआऊट घेवून सोबत त्या वाहनावर केलेल्या कार्यवाहीचे चलान जोडून वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 500, 501 आणि 506 नुसार दिलेल्या तक्रारीवर वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 213/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.
या प्रकरणातील फेसबुक पेज आणि त्यावरील क्रिया प्रतिक्रिया पाहुन असे वाटते की, वाहनतळामध्ये वाहन उभे असल्यावर त्या गाडीवर मोटारवाहन कायद्याची कायदेशीर कार्यवाही करता येणार नाही काय? मागील दोन वर्षापासून एखाद्या वाहनामध्ये कंपनीचे साहित्या ऐवजी दुसरे साहित्य जोडले तर कार्यवाही सुरू आहे. अद्याप याचा प्रचार झाला नाही काय ? आणि अशा परिस्थितीत एखादी कार्यवाही झाली तर पोलीसांना शिव्या दिल्या जातील काय ? कायदा बनविणाऱ्यांनी मोटार वाहनतळा उभ्या असलेल्या वाहनावर कार्यवाही करू नये असे त्या कायद्यात नवीन कलम अंर्तभुत करावे असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. कदमची बदली व्हावी अशी अपेक्षा या फेसबुकवर करण्यात आली आहे. तीन वर्षाचा कदम यांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे या महिन्यात त्यांची बदली होणारच आहे. पोलीस अधिक्षकांनी कदमचा सातबारा केलेला नाही. पण ही मागणी करतांना शिव्या देणे आवश्यक होते काय आणि आपल्या वाहनात केलेल्या बदलाबदल कोणीच कांही बोलत नाही ही भारतीय लोकशाहीची थट्टा नव्हे काय ? ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर आम्ही सुध्दा दलाल समजले जावू जे या फेसबुकवर लिहिले आहे त्याबद्दल आम्ही अगोदरच म्हणू इच्छीतो की, अच्छे ने अच्छा कहा हमे, बुरेने बुरा कहॉं हमे, जिसको जितनी जरुरत थी उसने उतनाही पेहचाना हमे! असे अमिताभ बच्चन म्हणतात, आम्ही नव्हे!
