ताज्या बातम्या विशेष

पोलीसांनी मला दाखवलेली दहा ग्रॅम सोन्याची अंगठी परत मिळाली नाही

चोरी झालेल्या घरमालकाचा टाहो
नांदेड(प्रतिनिधी)-एका ठिकाणी चोरी झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी त्या चोरी प्रकरणातील सर्वच आरोपींना पकडले. ज्यांच्या घरात चोरी झाली होती त्यांना त्यांच्या घरातून चोरी गेलेले सोन्याचे साहित्य दाखवल्यानंतर सुध्दा एक 10 ग्रॅमची अंगठी मला दाखवून देण्यात आली नाही याबाबत चौकशी करावी असा अर्ज या तक्रारदाराने पोलीस अधिक्षकांना दिला आहे.
श्रावस्तीनगर भागात राहणारे नितीन गजानन सावंत  यांच्या घरी 21 जून 2020 रोजी चोरी झाली होती. या चोरीनंतर चोरटे घरातील साहित्य घेवून जात असतांना रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसले. त्या भागात त्यावेळेस एक पोलीस गाडी जातांना सुध्दा दिसते. पण पोलीसांनी मध्यरात्री तुम्ही लोक काय करत आहेत अशी साधी विचारणा करण्यासाठी आपली गाडी थांबवली नाही आणि चोरट्यांनी आपला डाव साधला. ही घटना सुध्दा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे.
यानंतर नितीन गजानन सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 240/2020 दाखल केला. नितीन सावंतच्या तक्रारीप्रमाणे 3 लाख 58 हजार 340 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. शिवाजीनगर पोलीसांनी मोठी मेहनत घेवून या प्रकरणातील जवळपास 10 ते 12 चोरट्यांना पकडले. त्यानंतर नितीन सावंतला बोलावून चोरट्यांकडून जप्त केलेला मुद्देमाल दाखवला. त्यानंतर हा मुद्देमाल न्यायालयातून मिळवा अशी कायदेशीर समज सावंतला दिली.


त्यानुसार सावंंत यांनी न्यायालयात अर्ज करून आपल्या येथून चोरी गेलेले साहित्य परत मागितले तेंव्हा न्यायालयात मात्र त्यांना दाखवण्यात आलेली एक 10 ग्रॅमची अंगठी नव्हती. म्हणून न्यायालयाने त्यांना दिली नाही. नितीन सावंत असे सांगत होते की, माझ्या येथून चोरी झालेल्या ऐवजापैकी सर्वचे सर्व चोरटे पकडल्या गेल्यानंतर सुध्दा 50 टक्के ऐवज जप्त झाला नाही आणि जो झाला, जप्ती अभिलेखात दाखवण्यात आला त्यातील एक 10 ग्रॅमची अंगठी मला दिली नाही. नितीन साावंत सांगतात प्रश्न 10 ग्रॅमच्या अंगठीचा नाही पण पोलीस दलात सुरू असलेल्या गोंधळाचा नक्की आहे. मग मला दाखवलेली अंगठी कोठे गेली? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नितीन सावंत पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहे. पण त्यांना आम्हाला कांही बोलायचे नाही काय सांगायचे ते न्यायालयाला सांगा अशी सुंदर समज दिली जात आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या घोषवाक्याला कोणी तरी न्याय देईल काय अशी अपेक्षा नितीन सावंत व्यक्त करत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.