विशेष

देगलूरमध्ये बनावट पोलीसांनी पुन्हा हात दाखवला

एक तोतया पोलीस 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)- बनावट पोलीसांनी देगलूर शहरात बऱ्याच कांड केल्यानंतर एका तोतया पोलीसाला देगलूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मागील महिन्यात बनावट पोलीसांनी देगलूर शहरात बऱ्याच जणांना आपला हातखंडा दाखवून सोन्याचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या. देगलूर पोलीसंानी याबाबीला अत्यंत गांभीर्याने घेतले. दि.29 जून रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास यादवराव व्यंकटराव गायकवाड रा.चांडोळा ता.मुखेड हे शिवाजी महाराज पुतळा देगलूर जवळून नवीन बसस्थानकाकडे पायी जात असतांना दोन जण आले आणि आम्ही मुंबईचे पोलीस आहोत असे सांगून त्यांच्या हातातील अंगठ्या पिशवीत ठेवून सांभाळून घेऊन जा नाही तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड लावतो असे सांगितले. हे सर्व करत असतांना त्यांनी यादवराव गायकवाडची नजर चुकवून त्यांच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या 55 हजार रुपये किंमतीच्या फसवणूक करून चोरून नेल्या.


देगलूर पोलीसांनी या अज्ञात तोतय्या, बनावट मुंबई पोलीसांविरुध्द गुन्हा क्रमांक 301/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जकीकोर यांच्याकडे आहे. यापुर्वी सुध्दा देगलूर शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ऐवज चोरू नेल्याचे प्रकार घडले होेते. त्या प्रकरणांमध्ये देगलूरचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पुनम सुर्यवंशी यांच्याकडे तपासावर असलेल्या अशाच एका बनावट पोलीस प्रकरणात देगलूर पोलीसांनी राजू उर्फ राजाराम गंगाराम राठोड (30) रा.बावळगाव भवानी तांडा ता.औराद जि.बिदर, कर्नाटक या माणसाला अटक केली आहे. देगलूर न्यायालयाने राजू उर्फ राजाराम राठोडला 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. तोतया पोलीस संदर्भाने पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तोतया पोलीस बनून फसवणूक करणारे सर्वच भामटे आम्ही शोधले आहेत आणि त्यांना लवकरच जेरबंद करून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करणार आहोत. भगवान धबडगे यांचा विश्र्वास खरा ठरला तर देगलूर शहरात बनावट पोलीस हा प्रकार लवकरच बंद होईल अशी आशा करायला हरकत नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *