नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील खुशालसिंह नगर कमानीजवळ तीन जणांनी पाच मोबाईल शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेले आहेत. अंबीका मंगल कार्यालय समोरील रस्त्यावर एका महिलेची सोन्याची चैन तोडण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोटारसायकल चोरी झाली आहे.
महंमद नबीसाब लकुंडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत आणि मोरगे कंस्ट्रक्शनमध्ये काम करतात. 2 जुलै रोजी मध्यरात्रीनंतरच्या 3.45 यावेळेत ते खुशालसिंह कमानीजवळ असतांना तीन अज्ञात दरोडेखोर आले आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या आणि इतरांजवळचे असे 5 मोबाईल 63 हजार 500 रुपयांचे बळजबरीने चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक अनलदास अधिक तपास करीत आहेत.
सुरेखा बालाजी सोनकांबळे या महिलेला 2 जुलै रोजी सकाळी 5.45 वाजेच्यासुमारास अंबीका मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करत असतांना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 21 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
मनोज काशिनाथ पाटील हे सरकारी अभियांत्रीकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.30 जून रोजी रात्री 9.30 ते 10.40 या एका तासाच्या अंतरात त्यांच्या घरासमोर अशोकनगर गोपाळचावडी येथे ठेवलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.1448 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कानगुले अधिक तपास करीत आहेत. या सर्व तीन चोरी प्रकरांमध्ये एकूण 1 लाख 14 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.