5 चोऱ्यांमध्ये 11 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नाथनगर परिसरातून एका गृहणी महिलेचा 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक डिसेंबर 2020 मध्ये चोरीला गेला आहे. यासोबतच लोहा येथील महावितरणचे गोदाम फोडण्यात आले आहे. वजिराबाद भागातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. उस्माननगर येथील शेतातील मोटारपंप चोरीला गेला आहे. तसेच शिरड ता.हदगाव शिवारातील आखाड्यावरील साहित्य चोरीला गेले आहे. या सर्व पाच चोरी प्रकारांमध्ये 11 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
नाथनगर, नमस्कार चौकाजवळ राहणाऱ्या जयश्री शिवराज बुरपल्ले यांचा ट्रक क्रमांक एम.एच.26 ए.डी.0676 हा 1 जानेवारी 2020 च्या सकाळी 10 ते 31 डिसेंबर 2020 च्या रात्री 8 वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोरून चोरीला गेला आहे. या ट्रकची किंमत 10 लाख रुपये आहे.विमातळ पोलीसांकडे तक्रार 1 जुलै रोजी दिल्यानंतर विमानतळ पोलीसांनी हा ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ठाकूर अधिक तपास करीत आहेत.
ऋषीकांत वासुदेव जांभुळे हे सहाय्यक अभियंता विजय वितरण कंपनी लोहा कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जून ते 29 जून दरम्यान महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोदाममधील खिडकीतून आत प्रवेश करून त्यातील किटकॅट आणि फ्युज असा 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 1 जुलै रोजी तक्रार दिल्यानंतर लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
शरणपालसिंघ दिपसिंघ बंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एम.एच.26 ए.वाय.3962 क्रमांकाची त्यांची 45 हजारांची दुचाकी 1 जुलैच्या सकाळी 10 वाजता गुरूद्वारा गेट क्रमांक 2 समोरून चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
मारोती गंगाराम झुलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जूनच्या सकाळी 6 ते 28 जूनच्या दुपारी 2 वाजेदरम्यान वाका ता.लोहा येथील त्यांच्या शेतातील मोटार, स्टार्टर, वायर आणि पाईप असा 44 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
अंकुश दाजीबा कल्याणकर रा.शिरड ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जुलैच्या मध्यरात्री कधी तरी त्यांच्या शिरड शिवारातील आखाड्यावरून फवारणीचे पंप, सोलार पॅनल असा 10 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुंडीक अधिक तपास करीत आहेत.