नांदेड(प्रतिनिधी)-कंत्राटी मजुरीचे चार महिन्याचे थकीत बील तयार करून ते मंजुर करून आणण्यासाठी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सहस्त्रकुंड येथील मुख्याध्यापकाने 1500 रुपयांची लाच स्विकारल्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
29 जून रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली की, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सहस्त्रकुंड येथील मुख्याध्यापक नामदेव सोपानराव कैलवाड (56) हे त्यांचे कंत्राटी मजुरीचे 4 महिन्याचे बिल तयार करून मंजुर करुन आणण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. 29 जून रोजीच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या मागणीची पडताळणी केली. त्यात तडजोड होवून लाचेची रक्कम 1500 रुपये ठरली. आश्रमशाळा सहस्त्रकुंड येथे 30 जून रोजी लावण्यात आलेल्या सापळ्यात मुख्याध्यापक नामदेव कैलवाड यांनी 1500 रुपयांची लाच स्विकारली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले आहे. या बाबत ईस्लापूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक नामदेव सोपनराव कैलवाड (56) रा.वैभवनगर, जैनमंदिराजवळ नांदेड याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राजेश पुरी, पोलीस अंमलदार संतोष शेट्टे, एकनाथ गंगातिर, दर्शन यादव, शेख मजीब यांनी ही सापळा कार्यवाही पार पाडली. लाच ुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापकाची माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 आणि पोलीस उपअधिक्षक विजयडोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
