नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप यांना आज सेवानिवृत्तीनंतर अत्यंत शानदार समारंभात निरोप देण्यात आला. उद्यापासून नांदेडचे प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एल.आनेकर हे असतील.
नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप यांना आज सेवानिवृत्तीच्या दिवशी दुपारनंतर नांदेड येथील सर्व सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, मुख्य न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वकील मंडळी, न्यायालयातील इतर अधिकारी व कर्मचारी, पोलीस यांनी एका शानदार समारंभात निरोप दिला. आपली सेवा पुर्ण करून आज श्रीराम जगताप सेवानिवृत्त झाले. आज सकाळपासूनच त्यांच्या न्यायालयातील आगमनाप्रसंगी आणि जातांना त्यांच्यासाठी रेड कारपेट अंथरण्यात आला होता. श्रीराम जगताप नांदेड जिल्ह्यात या अगोदर पहिले जिल्हा न्यायाधीश या पदावर सुध्दा कार्यरत होते. त्यांच्या कामकरण्याच्या पध्दतीने वकील, न्यायाधीश यांच्यामध्ये त्यांचा प्रभाव होता. आज फुलांचा वर्षाव करत त्यांना रेड कारपेटवरून निरोप देण्यात आला. याप्रसंगी सौ.जगताप सुध्दा उपस्थित होत्या. वजिराबाद पोलीसांच्या वाहनासोबत एका मोठ्या ताफ्यात श्रीराम जगताप यांना त्यांच्या निवासस्थानी पोहचविण्यात आले. अत्यंत हसतमुखाने सर्वांनी दिलेला सन्मान स्विकारून त्यांना धन्यवाद देत श्रीराम जगताप यांनी निरोप घेतला.
उद्या दि.1 जुलै पासून नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एल.आनेकर हे असतील. उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस.जी.दिघे यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अहमदनगर येथून वाशिम येथे बदली देण्यात आलेल्या एस.एल.आनेकर यांना त्या बदलीत बदल करत त्यांना नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद दिले होते.
