नांदेड (प्रतिनिधी)- सन 2021 चा गणेशोत्सव कसा साजरा करावा यासंदर्भाने महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार कोवीड नियमावली तोपर्यंतही सुरू राहील हाच त्याचा अर्थ दिसतो.
यंदाचा गणेशोत्सव दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून सुरू राहील तो गणेशोत्सव दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी अर्थात भाद्रपद शुक्ल चतुदर्शी अर्थात अनंत चतुदर्शीच्या दिवशी संपणार आहे. सध्याच्या कोवीड कालखंडामध्ये शासनाने नवीन सापडलेल्या डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभुमिवर नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीतील सर्व नियम मान्य करून गणेश भक्तांना आपला आनंद साजरा करायचा आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिका यांची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मुर्तींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुर्तीची उंची 4 फुट आणि घरगुती मुर्तीची उंची 2 मर्यादेत असावी. यावर्षी पारंपारिक गणेश मुर्तीऐवजी धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. शाडूची मुर्ती पर्यावरण पुरक असल्याने त्या मुर्तीचे विसर्जन घरीच करावे. उत्सावासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिली तर त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षीत होणार नाही यावर लक्ष ठेवायचे आहेत. जाहिराती प्रदर्शित करताना आरोग्य आणि सामाजिक संदेश हे विषय त्यात असावेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. स्वच्छता जनजागृती करावी. ब्रेक द चैन या नियमावलीनुसार सर्व निर्बंध कायम राहतील. गणेश उत्सावात कोणतीही शिथीलता देता येणार नाही. गणेश मुर्तींच्या दर्शनासाठी सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक याद्वारे उपलब्ध करून द्यावी. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजन करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. प्रदूषण संदर्भातील नियमावलीचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. गणपती मंडळामध्ये निर्जतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंग यासंदर्भाची व्यवस्था असावी. गणेश भक्तांसाठी शारिरीक अंतर, स्वच्छता, मास्क काटेकोरपणे पालन करावे.
श्रीच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींना विसर्जन स्थळी घेऊन जाऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती करावी. कोवीड-19 या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महापालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन बंधनकारक राहील. शासनाने आपले हे परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक क्रमांक 202106291308364729 नुसार प्रसिद्ध केला आहे.
