18 लाख 82 हजार रुपयांचा रोख दंड; मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड यांनी दिला निकाल
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्राम विकासाचा निधी परस्पर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता विविध बॅंक खात्यांमध्ये हस्तांतरीत करून एक कोटी 18 लाख 83 हजार रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केला म्हणून नांदेडचे मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाडला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 18 लाख 80 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडातील 18 लाख रुपये रक्कम जिल्हा परिषदेला देण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.6 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शांताराम काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेतील ग्राम विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड (52) यांनी दि.22 जून 2016 ते 19 जुलै 2016 दरम्यान ग्राम विकासासाठी ग्राम पंचायतीकडून येणाऱ्या प्रस्तावांवर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेवून तो निधी ग्राम विकासासाठी देण्याची जबाबदारी उत्तम कोमवाड यांच्यावर असतांना त्यांनी आपली जबाबदारी विसरून जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीचे खाते क्रमांक 62005899192 मधून दिल्ली, फरीदाबाद आणि मुंबई येथील एस.बी.आय.एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सीस बॅंकेच्या खात्यावर आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे एक कोटी 18 लाख 82 हजार रुपयांची मोठी रक्कम वळती केली आहे.
या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420 नुसार गुन्हा दाखल केला. वजिराबादचे पोलीस निरिक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद झोटे आणि पोलीस अंमलदार मधुकर टोणगे यांनी याप्रकरणी तपास करून उत्तम आनंदा कोमवाडला अटक केली. त्या संदर्भाने आवश्यक असलेले पुरावे जमा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. उत्तम कोमवाडला अटक झाली तेंव्हापासून आजपर्यंत न्यायालयाने त्याला जामीन दिलेला नाही. आज पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार नितीन केंद्रे आणि तेलंग यांनी तुरूंगातून उत्तम कोमवाडला न्यायालयात हजर केले.
तुमच्याविरुध्द सुरू असलेल्या खटल्यातील भारतीय दंड संहितेचे कलम 409 आणि 420 संदर्भाने तुम्हाला दोषी मानन्यात येत आहे. तेंव्हा तुम्हाला काय सांगायचे आहे असा प्रश्न न्यायाधीश सचिन पाटील यांनी उत्तम कोमवाडला विचारला. तेंव्हा मी कांहीच केले नाही असे एक वाक्याचे उत्तर उत्तम कोमवाड यांनी दिले. त्यांच्या वकीलांच्यावतीने या प्रकरणात झालेला अपहार त्यांना मिळाला नाही, गेली पाच वर्ष ते तुरूंगात आहेत. म्हणून त्यांना दया दाखवावी अशी विनंती करण्यात आली. सरकरी वकील ऍड. सुनंदा चावरे यांनी घडलेला प्रकार जनतेच्या पैशाशी सबंधीत आहे. सार्वजनिक रक्कम उत्तम कोमवाडने हडप केली आहे. ते वर्ग 1 चे अधिकारी आहेत. त्यांच्या हातून घडलेला हा अपहाराचा प्रकार जास्तीत जास्त शिक्षा देवून समाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्याविरुध्द संदेश जाईल अशी विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सचिन पाटील यांनी उत्तम आनंदा कोमवाड यास भारतीय दंड संहितेच्या कलम 409 प्रमाणे सात वर्ष सक्तमजुरी, 10 लाख रुपये रोख दंड आणि कलम 420 प्रमाणे सात वर्ष सक्तमजुरी आणि 8 लाख 82 हजार रुपये रोख दंड अशी ठोठावली. रोख दंड भरला नाही तर दोन्ही कलमांप्रमाणे प्रत्येकी उत्तम कोमवाडला प्रत्येकी 21 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम भरली तर त्यातील दहा लाख 18 लाख रुपये जिल्हा परिषदेला देण्यात यावेत असे आदेश दिले. वजिराबादचे पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे आणि प्रदीप कांबळे यांनी या खटल्याची प्रक्रिया योग्यरितीने चालण्यासाठी मेहनत घेतली. दिलेल्या दोन्ही शिक्षा उत्तम कोमवाडला एकत्रित भोगायच्या आहेत. अटक झाली तेंव्हापासून आजपर्यंत तुरूंगात होता ते दिवस शिक्षेतून सुट मिळणार आहेत.