महाराष्ट्र

सत्ता आली तरच काम करणार काय?- जयंत पाटील यांचा प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)- सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही असे बोलणे खऱ्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांचा समाचार घेतला.
आम्हाला सत्ता द्या, ओबीसी समाजाचे आरक्षण तीन महिन्यांत देतो असे वक्तव्य विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटील यांनी त्या शब्दांचा भरपूर समाचार घेतला. सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाहीत का ? असा सवाल करताच सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार नाही तर नाही असा फडणवीसांचा हट्ट योग्य नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने असे वक्तव्य केलेले नाही. भाजप सत्तेत येण्याची गरज नाही, कारण राज्यातील जनतेने त्यांना नकार दिला आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ओबीसी समाजाबद्दल भाजपला आज जो कळवळा निर्माण झाला आहे, मात्र यांच्यामुळेच छगन भुजबळ यांना तुरूंगात खितपत पडावे लागले होते आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला पक्षातून बाहेर काढले गेले. आज एकंदरीत एकही ओबीसी भाजपमध्ये राहणार नाही असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून झाला. ओबीसी चळवळ संपविण्याचे काम करण्यात आले असे पाटील म्हणाले.
छगन भुजबळ यांनी भाजपकडे काही तरी मार्ग काढण्याची विनंती केली होती, तेव्हा फडणवीस म्हणतात मला सत्ता द्या तीन महिन्यांत प्रश्न सोडवतो. अशा नेत्यांकडे मार्ग कसा निघेल. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, मराठवाडा संपर्कप्रमुख जयसिंगराव गायकवाड, डॉ.सुनील कदम, महम्मद खान पठाण, महेबुब पठाण यांची उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *