नांदेड (प्रतिनिधी)- सन 2018 मध्ये खडकपूरा येथील खैरूल-उलूम उर्दू प्राथमिक शाळा यांनी शासनाचे 6 लाख रूपयांचे अनुदान लाटल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांना पत्र दिल्यानंतर सुद्धा आज तीन वर्षे होत आहेत, तरी त्या शाळेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही अशी खंत मायनारिटीज डेमोक्रेटीक पार्टी (एमपीडी)चे शेख शमीम शेख इसाक यांनी व्यक्त केली आहे.
शेख शमीम शेख इसाक यांनी खैरूल-उलूम उर्दू प्राथमिक शाळेसंदर्भाने बरीच माहिती प्राप्त केल्यानंतर त्यांनी अनेक अर्ज दिले. त्या अर्जाच्या आधारे नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी 28 जून 2018 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांना पत्र दिले आणि त्या पत्रात अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत खोटे व बनावट दस्तऐवज आधारे शासनास अनुदान मागणी प्रस्ताव सादर करून शासनाचे 6 लाख रूपये अनुदान लाटले आहे. याबाबत संबंधितांवर नोंदविण्याचा विषय त्यात लिहिला होता.
आज तीन वर्षे पूर्ण होत असताना आजपर्यंत या पत्रावर कोणतीच कारवाई झाली नाही, असे शेख शमीम सांगत होते. ही शाळा एनटीसी मीलच्या जागेवर आहे आणि ती जागा किरायाने घेतल्याचे भाडेपत्र या शाळेच्या अभिलेखात जोडले आहे. अनेक प्रपत्रांमध्ये अनुदान अर्ज मागणी करताना अर्जातील माहिती असत्य असेल, तर संस्थेवर कायदेशीर आणि दंडात्मक कार्यवाही होऊ शकते असे लिहिलेले आहे. सन 2011-12 मध्ये संस्थेच्या सदस्यांचे प्रपत्र-2 नमुद केले आहे त्यामध्ये या संस्थेचे उपाध्यक्ष सन 2000च्या आसपास कधी तरी मरण पावले असताना ते जीवंत आहेत, असे दाखवून हे प्रपत्र भरले जातात, असे शेख शमीम यांनी सांगितले.
एनटीसी मीलच्या जागेमध्ये शाळा सुरू करताना एनटीसी मीलची परवानगी या शाळेकडे नाही, उलट ही जागा दुसऱ्याच्याच मालकीची आहे असे दाखवून त्या जागेला किरायाने घेतल्याचे कागदपत्र बनविण्यात आले ही बाब बेकायदेशीर असल्याचे शेख शमीम सांगत होते.
