नांदेड(प्रतिनिधी)-एक जबरी चोरी, एक दरोडा आणि एक घरफोडी करणाऱ्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. त्याचा एक साथीदार यापुर्वीच अटक करण्यात आलेला आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, पिराजी गायकवाड, देविदास चव्हाण, रविकिरण बाबर, येळगे, बालाजी यादगिरवाड, पवार आणि हनुमानसिंघ ठाकूर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर भागातील डॉक्टर्सलेनमधून आतिश विष्णू सुर्यवंशी (20) रा.लालवाडी रेल्वे पुलाजवळ यास पकडले. त्याने उस्माननगर येथील गुन्हा क्रमांक 92/2021 हा दरोड्याचा गुन्हा, लोहा येथील गुन्हा क्रमांक 90/2021 हा जबरी चोरीचा गुन्हा आणि लोहा येथील गुन्हा क्रमांक 87/2021 हा चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हे गुन्हे करतांना त्याच्यासोबत पारीस गंगाधर येईलवाड रा.गोदमगाव ता.नायगाव होता असे सांगितले, त्यास अगोदरच पकडण्यात आले आहे.पकडलेल्या आतिश सुर्यवंशीकडून दरोड्यात चोरलेला 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे उस्माननगरच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आणि अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांचे कौतुक केले आहे.
