या प्रकरणाशी संबंधीत परस्पर विरोधी तक्रार
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागार्जुना हॉटेलजवळ 21 जून रोजी सायंकाळी झालेल्या भांडण प्रकरणात दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात जीवघेणा हल्ला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात गंभीर दुखापत असा प्रकार पोलीस दप्तरी नोंद आहे. जिवघेणा हल्ला प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराचे नाव आरोपी क्रमांक 1 असे आहे.
संजय संभाजी देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुझ्यामुळे आमची (डुकरे)जनावरे आहेत. गायब होत आहेत. या कारणावरुन तलवार, खंजीर आदीच्या सहाय्याने गंभीर मार दिला. संजय देवकरचे वडील भांडण सोडविण्यासाठी आले तेंव्हा त्यांनाही आरोपींनी मारले. यात संजय देवकरने लिहिल्याप्रमाणे पोलीस अंमलदार बकल नंबर 3187 घुंगरुसिंग जितसिंग टाक नेमणूक देगलूर पोलीस ठाणे, किरपानसिंग शेरसिंग टाक, अनिल उर्फ अन्या, जोगिंदर व इतर अनोळखी तीन जण या मारहाणीमध्ये गुन्हेगार आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 148, 149, 324, 323, 504, 506,34 आणि भारतीय हत्यार कायद्यातील कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 241/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र मुंडे हे करीत आहेत.
या प्रकरणात परस्पर गुन्ह्याची नोंद करतांना अनिल मलिक्कार्जुन मठपती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता नागार्जुना हॉटेलजवळ डुकरे आम्हाला न विचारता परस्पर चोरून घेता आणि बाजारात विकता या कारणावरुन माझ्या मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारत असतांना मी सोडवायला गेलो तेंव्हा माझ्या पायाच्या फेंड्रीला, मांडीला, कानावर, उजव्या हातावर खंजर मारून व डोक्यात दगड मारून जखमी केले. माझ्या मित्राचे काका घुंगरू टाक भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना पण या प्रकरणातील चार जणांनी खंजर, कत्ती व दगडाने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणात रामा देवकर, संभा देवकर, संजू देवकर व इतर एक असे चार आरोपी आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 326, 323, 504, 506,34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 240/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार चांदणे हे करीत आहेत.
