ताज्या बातम्या

डीआयजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात; पोलीस निरिक्षक पेट्रोलिंगवर; उद्या सकाळी ११ वाजता पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात हजर राहण्याचे घोरबांड यांना आदेश ?

सकाळी 10 वाजल्यापासून आपली तक्रार नोंदविण्यासाठी थांबलेला फिर्यादी भेटला डीआयजी साहेबांना
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आज 24 जून रोजी सायंकाळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते, पण समाजाच्या उन्नतीसाठी सर्वात जास्त आवडीने काम करणारे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड पोलीस ठाण्यात हजर नव्हते. याची दखल पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी गंभीरपणे घेतल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. निसार तांबोळी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गेले तेव्हा त्याठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून आपली तक्रार देण्यासाठी थांबलेले फिर्यादीपण निसार तांबोळी यांनी पाहिले.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपासून बिनतारी संदेश यंत्रणेवर पोलीस उपमहानिरीक्षकाच्या नियंत्रण कक्षाने पोलीस निरीक्षक घोरबांड यांना कॉल दिला. पण  अशोक घोरबांड यांनी त्याचे उत्तर दिले नाही. पोलीस खात्यात एका एखादा कॉल जो कोणी ऐकल तो  आपल्या सहकारी व्यक्तीला त्यासंबंधाची माहिती दूरध्वनीवरून, मोबाईल फोनवरून देतो, जेणे करून त्याने त्वरीत प्रभावाने अशा बिनतारी संदेशयंत्रणेच्या कॉलला उत्तर द्यावे. आज पोलीस उपमहानिरीक्षकाच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या कॉलबाबत माहिती देण्यासाठी कोणी-कोणी अशोक घोरबांड यांना मोबाईल कॉल केला याची माहिती मात्र प्राप्त झाली नाही.
यानंतर सायंकाळी 6 वाजता निसार तांबोळी आपल्या कार्यालयातून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे निघाले. 6.10 वाजता निसार तांबोळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातपोहचले त्याही वेळेस पोलीस निरीक्षक घोरबांड पोलीस ठाण्यात हजर नव्हते. पोलीस उपमहानिरीक्षकांनी त्या ठिकाणची पाहणी केली तेव्हा सकाळी 10 वाजल्यापासून आपली फिर्याद देण्यासाठी बसलेला सर्वात जुना फिर्यादी त्यांना भेटला.त्यानंतर अनेक फिर्यादी तेथे हजर होते. या सर्वांची माहिती घेतल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासंदर्भाने अत्यंत गंभीर दखल घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. ती दखल पोलीस ठाण्याच्या सीसीटीएनएसमध्ये नोंद केली की, पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या कार्यालयातील अभिलेखात याची नोंद घेतली. यासंदर्भाची माहिती प्राप्त झाली नाही. पोलीस उपमहानिरिक्षकांनी आपल्या सोबतच्या अंगरक्षकाला पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची विचारणा करण्यास सांगितले तेंव्हा मी हस्सापूर हद्दीत पेट्रोलिंग करत आहे असे सांगितले. त्यानंतर निसार तांबोळी यांनी आपल्या अंगरक्षकाच्या दुसर्‍या मोबाईलवरून फोन करून स्वतः विचारले की आपण कोठे आहात त्यावेळी सुध्दा मी पेट्रोलिंग करत आहे असे घोरबांड यांनी सांगितले. पण पोलीस निरिक्षकांची गाडी मात्र पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या प्रांगणात उभी होती हे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी स्वतः पाहिले. त्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षकांनी उद्या २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात हजर राहाण्याचे आदेश पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
आज पोलीस उपमहानिरीक्षकांना प्रत्यक्षात आलेला हा प्रत्यय चांगलाच होता. कारण सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत एखाद्या तक्रारदाराला वाट पहावी लागत असेल ही बाब पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि याची दखल पोलीस उपमहानिरीक्षकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय सुद्धा लोक असे सांगतात की, पोलीस निरीक्षक घोरबांड दुपारी 12 च्या नंतर पोलीस ठाण्यात येतात आणि सायंकाळचा तर काही भरवसाच नसतो येतील की नाही येतील. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्याचे पोलीस ठाणे काम करत आहे अशा परिस्थितीची पाहणी स्वत: पोलीस उपमहानिरीक्षकांनी केली यापेक्षा जास्त काय लिहावे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.