नांदेड(प्रतिनिधी)-दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीला दगडाने ठेसून तिचा खून करणाऱ्या नवऱ्याला अर्धापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश बिरहारी यांनी मारेकरी नवऱ्याला चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मारोती काशीराम गिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी वेदीका (20) हिचे लग्न केदारनाथ तुकाराम बुलबुले (25) सोबत झाले होते. बारसगाव ता.अर्धापूर शिवारात अश्विन पवार यांच्या आखाड्यावर केदारनाथ आणि त्यांची पत्नी वेदीका राहत होते. 22 जूनच्या रात्री 9 ते 23 जूनच्या पहाटे 3 वाजेदरम्यान बारसगाव शिवारातील अश्विन पवार यांच्या आखाड्यावर केदारनाथने वेदीकावर दगडाने हल्ला केला. कारण तिने केदारनाथच्या दारुपिण्याच्या सवईला विरोध केला होता. केदारनाथने वेदीकाच्या तोंडावर, कपाळावर दगडाने केलेल्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी केदारनाथविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 156/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक आशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकिशन नांदगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
आज दि.24 जून रोजी रामकिशन नांदगावकर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी वेदीकेचा खून करणारा तिचा नवरा केदारनाथ तुकाराम बुलबुलेला अर्धापूर न्यायालयात हजर केले. तपासाची सुसूत्रता ठेवण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नांदगावकर यांनी न्यायालयासमक्ष मांडली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मंगेश बिरहारी यांनी केदारनाथ बुलबुलेला चार दिवस अर्थात २८ जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
