नांदेड (प्रतिनिधी)- 16 मार्च रोजी एमआयडीसीमधील एक गोडाऊन फोडून चोरट्यांनी 18 लाख 92 हजार 630 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. तो आज नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्या हस्ते तक्रारदाराला परत करण्यात आला.
16 मार्च रोजी मध्यरात्रीनंतर डीजॉन कॅजवल्स प्रा.लि. या एमआयडीसी डी-डी-5-2 हे कपड्यांचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी अनेक कपडे, कॉम्युटर आणि फक्त 500 रूपये रोख रक्कम असा एकूण 19 लाख 33 हजार 630 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 176/2021 दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे, कर्दनकाळ पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख असद, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, प्रभाकर मलदोडे, विश्वनाथ पवार, चंद्रकांत स्वामी, श्याम नागरगोजे, रेवणनाथ कोळनुरे, नामदेव मोरे आदींनी दिगांबर तुकाराम धुमाळे (50) रा. वाघाळा, नामदेव संभाजी मुंडे (53) रा. कौठा, नरसिंग रामकिशान ओझा (46) रा. काळजी टेकडी, सटवा पिराजी गायकवाड (40) हडको, यादव सुर्यकांत चव्हाण (34) मोंढा रोड लोहा या पाच चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडून अनेक कपडे जप्त करण्यात आले. या कपड्यांची किंमत 18 लाख 92 हजार 630 रूपये आहे. न्यायालयाकडून जप्त केलेला ऐवज परत देण्याचे आदेश आल्यानंतर आज पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्या हस्ते हा सर्व चोरीचा ऐवज तक्रारदाराला परत करण्यात आला.
