नांदेड(प्रतिनिधी)- वजिराबाद भागातील यशश्री हॉस्पीटलचे डॉ. विवेक शेटे आणि त्यांच्या दवाखान्यातील सुरक्षा रक्षक शेख मोईज विरूद्ध एका युवकाला रस्ता रोखून मारहाण केल्याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमोल देवराव हंबर्डे (24) हा युवक लोहा येथील रहिवाशी असून तो यशश्री हॉस्पीटल डॉक्टर लेनमध्ये काम करत होता, पण त्याने ती नोकरी सोडून डेल्टा हॉस्पीटलमध्ये काम करण्यास सुरूवात केली. 19 मे रोजी तो डेल्टा हॉस्पीटलमध्ये काम करत असताना अंबुलन्स घेऊन एका रूग्णाला यशश्री हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी डॉ.विवेक शेटेचा अंगरक्षक शेख मोईज उर्फ शाहरूख याने मला बोलावून डॉ. शेटेच्या कक्षात हजर केले. तेव्हा माझ्या हॉस्पीटलमध्ये काम करताना तु पैसे चोरलेस असा आरोप केला. अंगरक्षक शेख मोईजने डॉ.शेटेच्या सांगण्यावरून एका दुसऱ्या कक्षात नेले आणि लाथा-बुक्यांनी मारहाण केली. माझ्यावर झालेला प्रकार मी माझे नातेवाईक साई चिंचाळे आणि अजय गोपीवार यांना सांगितला. तेव्हा ते तेथे आले आणि माझा भाऊ अनिल मला सोडण्यासाठी सांगत असताना मी सोडणार नाही असे सांगत माझा मोबाईलपण ओढून घेतला. हा प्रकार सायंकाळी 5 ते सायंकाळी 6.30 दरम्यान घडला. डॉ. विवेक शेटेने त्या दिवशीच्या घटनेनुसार अमोल हंबर्डे आणि त्याच्या काही नातलगांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. पण आपल्यासोबत झालेल्या घटनेबाबत अमोलने लाऊन धरलेल्या मुद्यानुसार अखेर डॉ. विवेक शेटे आणि त्यांचा अंगरक्षक शेख मोईज उर्फ शाहरूख या दोघांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 342, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्र. 191/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याच तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबत होणाऱ्या दुर्व्यहारांबद्दल अनेक चर्चा होतात.त्या संदर्भाने अनेक बातम्या प्रसिध्द झाल्या पण आपल्या दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत सुध्दा डॉक्टर मंडळी कसा व्यवहार करतात याचे एक उदाहरण या गुन्ह्याच्या निमित्ताने समोर आले आहे. डॉक्टरांनी गडगंज श्रीमंत व्हावे पण श्रीमंतीसोबत आपल्या जीवनात प्रेमळपणा गमावू नये हीच अपेक्षा.
