नांदेड(प्रतिनिधी)-मागील दशकात वाहतूक शाखेमध्ये नियमाप्रमाणे आपले तीन वर्ष पुर्ण करणाऱ्या पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांना या काटेरी वाटेवर चालतांना करावी लागणारी कसरत आज तीन वर्ष पुर्ण झाल्यामुळे ती कमाल झाली आहे. नसता तो अपघात ठरला असता. आपली कमाल दाखवतांना त्यांना तारेवर कसरत करावी लागली, अनेक अडचणी आल्या. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळतांना नाकी नऊ आले. तरीपण आपल्या कर्तव्यावर न डगमगता त्यांनी आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.
पोलीस निरिक्षक या पदाची पदोन्नती मिळाल्यावर चंद्रशेखर एकनाथराव कदम यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यात झाली त्यावेळी पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा हे होते. मिणा यांनी चंद्रशेखर कदमवर सुरूवातीला भाग्यनगर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवली. एका राजकीय व्यक्तीवर कार्यवाही करण्याचा आदेश मिणा यांनी दिला. तो पूर्ण करत त्यांनी पोलीस अधिक्षकांकडून शाब्बासकी मिळवली खरी पण राजकीय व्यक्तीमत्वांकडून त्यांना खुप ताण मिळाला. तरीपण आपण केलेले काम किती योग्य आहे हे सांगण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केले नाहीत. पण त्यांनी केलेले काम खरेच खुप छान होते. त्यात योग्यरितीने आणखी तपास झाला असता तर त्या व्यक्तीविरुध्द खुप दिवसांपुर्वीच मकोका कार्यवाही झाली असती. कांही काळानंतर त्यावर ती मकोका कार्यवाही झाली पण तोपर्यंत चंद्रशेखर कदम यांना पोलीस अधिक्षक मिणा यांनी बदलून नांदेडच्या वाहतुक शाखेचे काम सांभाळण्याची जबाबदारी दिली.
दि.26 जून 2016 रोजी चंद्रशेखर एकनाथराव कदम हे वाहतुक शाखेच्या कार्यालयात पोलीस निरिक्षक पदावर आसीन झाले. आपल्या जीवनातील मागील अनुभवांचा फायदा घेत नांदेड शहराच्या वाहतुकीला एक चांगले वळण लागावे यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली. पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी सुध्दा त्यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी काम करत लाखो रुपयांमधील मोटार वाहन कायद्याप्रमाणे चुक करणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसुल केला. हे काम सुरू केल्यावर त्यांचे एक वर्ष पुर्ण होण्याअगोदरच चंद्रकिशोर मिणा यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी संजय जाधव हे पोलीस अधिक्षक पदावर आले. त्या काळात सर्व कांही ठिक चालले. चंद्रशेखर कदम यांनी संजय जाधव यांच्या कोणत्याही हाकेला कधीच नकारात्मकता दाखवली नाही. एका वर्षात पुन्हा नवीन एस.पी. आले. ते नवीन एस.पी.विजयकुमार मगर हे होते. मगर आल्यावर कांही दिवसांत चंद्रशेखर कदमला नांदेड जिल्ह्यातील तेलंगणालगत असलेल्या शेवटच्या पोलीस ठाण्यात जाण्याबाबत चर्चा करण्यासाठी बोलवले. या चर्चेत काय झाले माहित नाही पण चंद्रशेखर कदम यांना पोलीस अधिक्षकांच्या कक्षात भोवळ आली होती. याबाबत एका विचारवंताचे वाक्य उल्लेखीत करू इच्छीतो, “रोज खबरो में उभरना चाहते है, कोई हंगामा करना चाहते है, बाटकर फिर शिशीया तेजाब की, वो हमारे घाव भरना चाहते है ‘या बाबत तत्कालीन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकांनी नाटक करतो असे त्याचे वर्णन केले होते. मात्र दुर्देवाने त्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर बसण्याचे भाग्य चंद्रशेखर कदमचे नाटक म्हणणाऱ्या पोलीस निरिक्षकांना फक्त 14 दिवसांसाठी लाभले.प्रसिध्द कवी गुलजार म्हणतात “लापरवाही ही भली है साब, परवाह करो तो लोग सस्ता समझ लेते है’ त्यामुळे तयार झालेल्या परिस्थितीत चंद्रशेखर कदम यांनी आपल्या कामाची योग्यता कायम ठेवली आणि काम करत राहिले.
त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला. लॉकडाऊन काळात तर अनेकांना अन्नदान, त्यांच्या परतीच्या प्रवासाची विचारणा आणि रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेत त्यांनी केलेले काम त्यांच्या नोकरीच्या कर्तव्यापलिकडेेचे आहे. या सर्व कामांमध्ये वाहतुक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी चंद्रशेखर कदम यांच्या हाकेला दिलेला प्रतिसाद तेव्हढाच महत्वपूर्ण आहे. वाहतुक शाखेचे सेनापती आणि त्यांचे सैनिक यांनी केलेल्या मोटारवाहन कायद्यातील विविध कार्यवाहीसाठी त्यांच्यावर अनेकदा दबाव आले, त्यांच्याविरुध्द लिखाण केले गेले, त्यांच्याविरुध्द अर्ज देण्यात आले. कांही वेळेस त्यांच्या शाखेतील कांही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांच्याविरुध्द बंडाचा झेंडा फडकावला. कांही नामांकित पोलीस अंमलदारांनी सुध्दा या बंडाच्या झेंड्याला वारे देण्याचे काम केले पण कोणत्याही परिस्थिती आपला संयम न ढळू देता चंद्रशेखर कदम यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. यासाठी एका हिंदी विचारवंताचे वाक्य उल्लेखीत करावे वाटते, “अंधेरी सभा में सर उठाना सिख जाते है, दियों को बस जला दो झिलमिलाना सिख जाते है’.आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात करोडो रुपयांचा दंड शासनाच्या खात्यात जमा करतांना कदम यांनी चुकलेल्या माणसाला क्षमा करायचीच नाही असे ठरवले. यामुळे चंद्रशेखर कदम यांच्याबद्दल असे सांगितले जाते की, ते कधीच कोणाची शिफारस मान्य करत नाहीत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमावलीवर जनतेने चंद्रशेखर कदम यांना बोलणेच बंद केले. यावरून त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये दाखवलेल्या चुणूकीचे दर्शन होते.
आज एका शाखेेत एका शतकात तीन वर्ष पूर्ण करणाऱ्या पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांचे कौतुक आम्ही आमच्या लिखाणात केले नाही तर ती बोरू बहाद्दरी ठरेल म्हणूच या शब्दातून आम्ही त्यांचा गौरव करू इच्छीतो. या पुढे सुध्दा आपल्या जीवनातील प्रत्येक शाखेत त्यांनी आपला कायदेशीर विहित कार्यकाळ पूर्ण करावा या शुभकामनासह, “संभल कर राह में चलना वही पत्थर सिखाता है, हमारे पाव के आगे जो ठोकर बन के आता है,नहीं दिवार के जखमों का कुछ एसास इंसा को, जो किले गाडने के बाद तस्वीर लगाता है’ या शब्दांसह आज पुर्णविराम.
