नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती प्राप्त झालेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या-त्यांच्या पात्रतेप्रमाणे नियुक्त्या दिल्या. त्यातील कांही जण जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले. यापैकी एक नांदेडच्या एका राजकीय व्यक्तीच्या घरी पोलीस उपनिरिक्षकाचे गणवेश घालून चकरा मारत आहे. याचा शोध घेण्यासाठी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची गरज आहे.
कांही दिवसांपुर्वी नांदेडच्या 20 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती मिळाली. बहुतांश लोकांना ते सध्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्याच पोलीस ठाण्यात पदोन्नतीसह पुन्हा नियुक्ती देण्यात आली. पण त्यापैकी कांही जणांना त्यांच्यातील अद्वितीय कसब लक्षात घेवून प्रमोदकुमार शेवाळे यांनी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी नांदेडच्या नियंत्रण कक्षात नियुक्त केले. पोलीस अंमलदार असतांना सुध्दा आयपीएस पेक्षा मोठ्या तोऱ्यात वागणाऱ्या एका पोलीस अंमलदारापासून पोलीस उपनिरिक्षक झालेल्या व्यक्तीने काल दि.21 जून रोजी पोलीस उपनिरिक्षकाचा गणवेश परिधान करून नदी पलिकडील गुन्हे शोध पथकाच्या एका पोलीस अंमलदाराला सोबत घेवून नांदेडमध्ये वास्तव्यास असलेल्या एका राजकीय नेत्याचे घर गाठले. या राजकीय नेत्याच्या घरी महाराष्ट्रात नवीन सरकार येण्या अगोदर अनेक पोलीस अधिकारी, अंमलदार चकरा मारत होते आणि आपल्याला हवी ती नियुक्ती मिळविण्यात यश मिळवत होते.
सध्या महाराष्ट्रात नवीन सरकार आहे. या सरकारला नवीन म्हणता येत नाही. कारण त्यांना अडीच वर्ष झाले आहेत. तरीपण जुन्या सरकारमध्ये चलती असलेल्या राजकीय नेत्याच्या घरी जावून आजच्या परिस्थितीत आपली मनपसंद नियुक्ती प्राप्त करण्यासाठी हे नुतन फौजदार चकरा मारत आहेत. यांना नदी पलिकडचा काठ सोडायचा नाही आणि सोडायचाच असेल तर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती हवी असल्याने ते नेत्याच्या घरचे उंबरठे झिजवत आहेत. हे फौजदार त्या घरात गेले होते. हे शोधण्यासाठी त्या घराचे किंवा त्या आसपासच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर आम्ही लिहिलेले वृत्तांकन सत्य असल्याचे सिद्द होईल.
