नांदेड(प्रतिनिधी)-कोविड कालखंडात उपचारासाठी वण-वण फिरणाऱ्या सगरोळी ता.बिलोली येथील एका व्यक्तीचे घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजार 350 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. 36 तासात 100 टक्के जप्त करत बिलोली पोलीसंानी चोरी गेलेला ऐवज आपल्या ताब्यात घेतला होता. पोलीसंानी कोविड कालखंडात त्रस्त झालेल्या व्यक्तीचा तो ऐवज न्यायालयाच्या आदेशानंतर आज त्यांना परत केला तेंव्हा फिर्यादीने पोलीसांना पोटभरून धन्यवाद दिले.
अभय शेषराव वकील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सांस्कृतीक संवर्धन मंडळ सगरोळी येथे लेखापाल आहेत. याच संस्थेत त्यांचे मामा पद्माकर शंकरराव देशपांडे हे सुध्दा वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. दि.13 एप्रिल 2021 रोजी पद्माकर देशपांडे ,त्यांची पत्नी आणि दोन मुली कोरोना बाधीत झाले. हे सर्वजण कोरोनाचा उपचार घेण्यासाठी लातूर येथे गेले. उपचारादरम्यान त्यांची मुलगी प्रांजली हिचा मृत्यू झाला. अत्यंत दुखी मनाने पद्माकर देशपांडे, पत्नी आणि मुलगी प्रणिता असे तिघे 7 मे 2021 रोजी परत सगरोळीला आले तेंव्हा त्यांचे घरफोडलेले होते.
आपली बालिका मरण पावल्याचे दु:ख डोक्यावर असतांना पद्माकर देशपांडे यांच्या घरात चोरी झाली होती. संपूर्ण तपासणी केली असता 5 तोळे सोन्याच्या पाटल्या, दीड तोळा सोन्याचे मंगळसुत्र, कानातील झुमके, 8 तोळे चांदीच्या पैंजन, चांदीचे करंडे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 90 हजार 350 रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. तेंव्हा अभय वकील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि.7 मे 2021 रोजी गुन्हा क्रमांक 88/2021 दाखल करण्यात आला.
बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अनिल सनगल्ले यांच्याकडे देण्यात आला. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ यांच्या कुशल मार्गदर्शनात बिलोली पोलीसांनी 36 तासामध्ये पद्माकर देशपांडेच्या घरी चोरी करणारा चोरटा योगश निळकंठ शिंदे (25) रा.सगरोळी यास गजाआड तर केलाच पण त्याच्याकडील चोरलेले 1 लाख 90 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल पुर्णपणे जप्त केला.
पोलीस विभागाचे काम करतांना या समाजात जन्मल्यानंतर या समाजाची सेवा करणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. हे विचारवंतांचे वाक्य लक्षात ठेवून बिलोली पोलीसांनी कायद्यातील प्रक्रियेनुसार न्यायालयात फिर्यादीत अभय वकील यांना अर्ज देण्यास लावला. त्या अर्जासाठी पोलीसांवर असलेली जबाबदारी लालफितीत न अडकता अत्यंत द्रुतगतीने कशीपुर्ण होईल याकडे लक्ष दिले आणि बिलोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राजेश पत्की यांनी अभय वकील यांचे सर्व चोरीला गेलेले साहित्य परत करण्याचा आदेश दिला.
आज दि.21 जून रोजी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या हस्ते पद्माकर देशपांडे यांच्या घरातून चोरी झालेला सर्व ऐवज त्यांना परत करण्यात आला. या प्रसंगी पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे, अभय वकील यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक अनिल सनगल्ले, बिलोलीचे पोलीस अंमलदार अंकुश लुंगार हे हजर होते. आपल्या शब्दात पोलीसांनी घेतलेली मेहनत सांगतांना अभय वकील म्हणाले माझे मामा पद्माकर देशपांडे यांच्यासाठी पोलीसांनी घेतलेली मेहनत मी धन्यवाद म्हणून व्यक्त करू इच्छीत नाही तर पोलीसांच्या आमच्या कुटूंबासाठी घेतलेल्या मेहनतीचे ऋण कायम माझ्यावर राहावे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
