नांदेड (ग्रामीण)

मांजरम पांदन रस्त्याची चौकशी त्रिसदस्यीय समिती करणार

नायगाव.(प्रतिनिधी )- लोकसहभागातून केलेल्या मांजरम येथील पांदन रस्त्याचा मलिदा लाटल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर प्रकरणी तत्कालीन सरपंच व तीन ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून. कसून चौकशी झाल्यास अन्य काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      लोकसहभागातून केलेला पांदन रस्ता मांजरम ग्रामपंचायतच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी रोजगार सेवकाला हाताशी धरून रोहयोतून केल्याचे दाखवून  कुशल व अकुशल कामाचे ११ लाख रूपये उचलून घेतल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेल्या पत्रामुळे उघड झाला आहे. त्या पत्राने भ्रष्टाचाराचे बिंग फुटल्यामुळे मांजरम येथे खळबळ उडाली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दिगांबर निवृतीराव शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हा परिषदेकडे केली होती. त्याचबरोबर आ. राजेश पवार यांनीही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करत होते. तरीही गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी चालढकल करत होते.
     चौकशी करण्याबाबत सर्व स्तरावर दबाव वाढत असल्यामुळे गटविकास अधिकारी फांजेवाड यांनी दोन दिवसापूर्वी शाखा अभियंता डि.व्ही. गोणेवार, रोहयोचे ए पी ओ बलुले व पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी एस.आर. कांबळे अदि अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून. लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामाची रक्कम उचलून घेतल्या प्रकाराची नियमानुसार चौकशी करून सात दिवसात अहवाल देण्यात यावा असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. या आदेशामुळे रक्कम लाटलेल्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
     सदर प्रकरण दडपण्यासाठी बरेच राजकीय दडपण येत असल्याची पंचायत समितीच्या वर्तुळात बोलल्या जात असून सदर समितीने पारदर्शक चौकशी केल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच फौजदारी कारवाई होवू शकते. त्याचबरोबर अन्य काही प्रकरणही बाहेर येण्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.