हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत पोलीसांची संयुक्त कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची गंडवणूक करणाऱ्या एका वकीलासह सात जणांना हिंगोली पोलीसांनी अटक केली आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील कोणत्याही नागरीकाला नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाली असेल तर त्यांनी वसमत पोलीस ठाणे, हिंगोली पोलीस अधिक्षक यांच्याकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.
आज पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हिंगोलीचे अपर पोलीस अधिक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोलीचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, वसमतचे पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे यांची उपस्थिती होती.
निसार तांबोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मे 2021 रोजी वसमत पोलीस ठाण्यात पंडीत ढवळे यांनी तक्रार दिली की, संतोष बनवारीलाल सरोज रा.मच्छली जि.जोनपुर उत्तरप्रदेश याने रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून विविध बॅंक खात्यांमध्ये 10 लाख रुपये भरायला लावले. पण नोकरी मिळाली नाही. हा प्रकार सन 2018 मध्ये घडला होता. त्यानुसार वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 153/2021 दाखल करण्यात आला आणि त्याचा तपास सुरू केला तेंव्हा एकच नव्हे तर असंख्य मुलांची अशी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या ठकसेनांनी युवकांना मुंबई महानगरपालिका, भारतीय रेल्वे, भारतीय खाद्य निगम आणि भारतीय सैन्य दलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांची गंडवणूक केली होती. आज पर्यंत असे 20 ते 25 लोकांमुळे फसले आणि आपले लाखो रुपये गमावून बसल्याचे निसार तांबोळी यांनी सांगितले.
या तपासासाठी हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार किशोर कातकडे, विठ्ठल काळे, जयप्रकाश झाडे, वसमत शहर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक बोधनापौड, पोलीस अंमलदार संदीप चव्हाण, रवि ठेंबरे , विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांचे दोन पथक तयार करून तपास सुरू झाला. नांदेडच्या रेल्वे स्थानकावर 9 जून रोजी सापळा रचून पोलीसांनी रविंद्र उर्फ राबिंद्र दयानिधी संकुवा (46) रा.ओडीसा ह.मु.काटेमान्नीवली ता.कल्याण जि.ठाणे आणि ऍड. नरेंद्र विष्णुदेवप्रसाद (55) रा.लयरोपरुवार ता.कोपागंज जि.महू (उत्तरप्रदेश) या दोघांना पकडले. त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक मुलांना फसवल्याची माहिती दिली. त्यांची इतर साथीदार नांदेड, मुंबई, दिल्ली, आणि लखनौ येथे असल्याचे सांगितले. संपुर्ण भारतामध्ये अनेक युवकांना बनावट नियुक्ती पत्र देवून फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली.
या माहितीनंतर पोलीसांनी सतिश तुळशीराम हंकारे (26) रा.बोरगाव ता.लोहा ह.मु.अहमदपुर व नांदेड, आनंद पांडूरंग कांबळे (24) रा.अहमदपुर जि.लातूर यांना ताब्यात घेतले. नांदेड येथे पोलीस भरती प्रशिक्षण ऍकडमी चालवून सुशिक्षीत बेरोजगारांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा खुप मोठा नेटवर्क देशभरात सुरू असल्याचे निसार तांबोळी यांनी सांगितले. यानंतर गौतम एकनाथ फणसे (56)रा.वाघणी ता.अंबरनाथ जि.ठाणे यास पकडले. पुढे अभय मेघशाम रेडकर उर्फ राणे (48) रा.मोतीनगर नवी दिल्ली मुळ गाव शिरोडा, वेंगुर्ले जि.सिंधदुर्ग यास पकडले. यानंतर संतोषकुमार सरोज बनवारीलाल सरोज (29) रा.बोडेपुर ता.मच्छली जि.जौनपुर (उत्तरप्रदेश) यास पकडले. यांच्याकडून रेल्वे विभागाचे बनावट शिक्के, विविध मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट शिक्के, रेल्वे नियुक्तीपत्र, भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार असे लिहिलेले अनेक लिफाफे, बनावट नियुक्ती पत्र, लॅपटॉप, रेल्वेचे बनावट ओळखपत्र, अनेक मुलांचे बनावट नियुक्तीपत्र, अनेक एटीएम कार्ड, अनेक मोबाईल आणि या सात जणांच्या बॅंक खात्यावर झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती जप्त करण्यात आली आहे. 18 बॅंक खाते सिल करण्यात आले आहेत. त्यातुन 11 लाख रुपये रुपये गोठवण्यात आले आहेत. विविध आरोपींकडून 56 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 लाख रुपये किंमतीची एक गाडी आणि 7 मोबाईल 50 हजार रुपये किंमतीचे असा एकूण 20 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या सर्वांनी मिळून महाराष्ट्र, ओडीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांसह अनेक राज्यांमध्ये अनेक बेरोजगार मुलांची फसवणूक केली आहे. या सर्व तपासावर हिंगोलीचे पोलीस अधिक्षक एम.राजेश कलासागर यांचे नियंत्रण होते असे ही सांगितले आहे.या कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, वसमतचे पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे, वसमतचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनापौड, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार किशोर कातगडे, विठ्ठल काळे, वामन पवार, निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, संदीप चव्हाण, रवि ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांनी घेतलेल्या सहभागासाठी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये अशी बनावट नियुक्तीपत्रे देण्याचा प्रकार जनतेतील कोणासोबत घडला असेल तर त्यांनी हिंगोली पोलीस अधिक्षक आणि वसमत पोलीस ठाणे येथे संपर्क साधून माहिती द्यावी जेणे करून अशी फसवणू करणाऱ्या या लोकांसह इतर लोकांना कायदेशीर धडा शिकवणे शक्य होईल असे आवाहन पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.