नांदेड(प्रतिनिधी)-असदवन येथील एका जमीनीचे प्रकरण नांदेड ग्रामीण पोलीसंानी दाबल्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर दोन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करावा लागला आहे. या प्रकरणातील तक्रारदार सुध्दा महिला आहे.
नांदेडच्या कनिष्ठ न्यायालयात सादर करण्यात आलेल्या इतर किरकोळ फौजदारी अर्ज क्रमांक 34/2021 च्या माध्यमाने फरजाना बेगम मोहम्मद जैनोद्दीन रा.पिवळी बिल्डींग मंडई नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माळटेकडी येथे त्यांचे शेत सर्वे नंबर 160/03 मध्ये 14 आर एवढी शेत जमीन आहे. ती शेत जमीन खरेदी खत क्रमांक 5524/1991 नुसार दि.15 जून 1991 रोजी खरेदी केलेली आहे. आजपर्यंत त्या जागेची मालकी आणि ताबा फरजाना बेगम यांच्याकडे आहे.
या जमीनीवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुजफर खान महेबुब खान (45) रा.बर्की चौक आणि अनसार खान अकबर खान रा.माळटेकडी या दोघांनी 7/12 च्या अभिलेखात आपल्या नावाचा अमल केला आहे. वडीलोपार्जित वारसा हक्काची एकत्र कुटूंब पध्दतीतील ही शेत जमीन 8 वारसदारांची आहे. माझे मयत भाऊ गुलाम रब्बानी गुलाम समदानी यांच्यासोबत संगणमत करून खोटे कागदपत्रे बनवली आहेत. माळटेकडीजवळी या जागेला आता मोठी किंमत आल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. 8 डिसेंबर 2020 रोजी रात्रीच्यासुमारास बुलडोजरच्या सहाय्याने माझ्या वडीलांच्या नावे असलेली पाटी तोडून त्या ठिकाणी ती जमीन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. अत्यंत दहशतीचे वातावरण तयार करून कांही मोठ्या मंडळीच्या वरद हस्ताने हे दोघे असे प्रकार करतात. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना तक्रार केली पण त्यांनी कसलीच कार्यवाही केली नाही. म्हणून मला न्यायालयासक्षम हजर व्हावे लागले. 5 फेबु्रवारी 2020 रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी माझी तक्रार घेण्यास नकार दिला. म्हणून मी 16 डिसेंंबर 2020 रोजी नांदेडच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. 17 डिसेंबर 2020 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र यांनाही अर्ज दिला पण अद्याप त्यावर कांही कार्यवाही झाली नाही म्हणून न्यायालयाच्या उंबरठ्यावर मी उभी आहे.
फरजाना बेगमच्यावतीने ऍड. आर.डी.राठोड यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानुन न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीसांना आदेश दिला की, मुजफर खान महेबुब खान आणि अनसार खान अकबर खान या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420,468, 471, 379, 120(ब), 294, 504, 506,34 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या वरून नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 404/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सर्वसामान्य माणसाचे काम करण्यासाठी नेहमी तळमळ करणाऱ्या पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
असदवन येथे सुध्दा अशाच एका महिलेच्या जमीन प्रकरणात राडा झाला होता. या संदर्भाने बातम्या प्रसिध्द झाल्या. महिला पोलीस अधिक्षकांना भेटल्या आणि त्यानंतर त्या महिलेची मागणी अत्यंत जलदगतीने पुर्ण करतांना पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांनी 50 मोदकांचा प्रसाद उत्पन्न केला होता म्हणे. आता तक्रारीतील महिलेसोबत किती मोदकांच्या प्रसादांचे नवीन उत्पादन होणार या बाबत माहिती मिळवता आली नाही.
