नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन, विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी एक दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली आहे.
19 जून रोजी वजिराबाद गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, चंद्रकांत बिरादार, शेख इम्रान हे सर्व गस्त करत असतांना मिल क्लब गंगाचाळ परिसरात एका अल्पवयीन बालकाजवळ एक दुचाकी गाडी होती. त्या गाडीवर नोंदणी क्रमांक नव्हता. पोलीस पथकाने याबाबत त्या बालकाकडे विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. पोलीसांनी प्राप्त केलेल्या माहितीनुसार ही दुचाकी गाडी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 367/2021 मध्ये चोरीला गेलेली होती. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भोसले यांच्याकडे या बाबतचा तपास होता. तेंव्हा वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या आदेशाने जप्त केलेली गाडी आणि अल्पवयीन, विधीसंघर्षग्रस्त बालक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
