नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्यातील दोन आरोपी आणि एक तिसरा अशा तीन घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. यांच्याकडून कांही दागिणे व एक दुचाकी गाडी असा 2 लाख 14 हजार 298 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेकडून प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या प्रेसनोटप्रमाणे 19 जून रोजी त्यांच्या पथकाने मोहन(छोटा) बाबूराव उर्फ राजेंद्र भोसले (29) रा.कुरुळा ता.कंधार, मोहन (मोठा) बाबूराव उर्फ राजेंद्र भोसले (42) रा.कुरूळा ता.कंधार आणि संजय शहाजी भोसले (38) रा.देळूप ता.अर्धापूर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, माळाकोळीच्या हद्दीत, मुखेडच्या हद्दीत चोऱ्या आणि अर्धापूरच्या हद्दीत मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. या अट्टल घरफोडी करणाऱ्या लोकांकडून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोन्या-चांदीचे दागिणे आणि एक मोटारसायकल असा 2 लाख 14 हजार 298 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांनी केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यासंदर्भाने त्यांची रवागनी अर्धापूर आणि मुखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या पकडलेल्या लोकांपैकी मोहन(मोठा) याच्याविरुध्द तुळजापूर आणि नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी अशा दोन पोलीस ठाण्यामध्ये मकोका कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच मोहन (छोटा) आणि मोहन मोठा या दोघांविरुध्द नांदेड जिल्ह्यात चार गुन्ह्यांमध्ये फरारी आरोपी अशी नोंद आहे. या तिन जणांना पकडल्यामुळे या पुढे होणाऱ्या घरीफोडीच्या गुन्ह्यांवर नक्कीच वचक येईल असा विश्र्वास पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी व्यक्त केला.
पोलीस अधिक्ष प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक संजय सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, संग्राम केंद्रे, संजय जिंकलवाड, बालाजी तेलंग, रुपेश दासरवाड, पिराजी गायकवाड, देविदास चव्हाण, निष्णात पोलीस अफजल पठाण, रवि बाबर, बालाजी यादगिरवाड, विठ्ठल शेळके, हनुमानसिंह ठाकूर यांनी या चोरट्यांना पकडण्याची कार्यवाही केली.
