नांदेड(प्रतिनिधी)- गाव निसर्गानं नटवण्यासाठी गावकऱ्यांनी लोकचळवळ उभी करावी. तसेच पारंपारीक वक्षांचे संवर्धन व जतन केल्यास पुढच्या पिढीला आपण नैसर्गिक प्राणवायू देण्यास समर्थ ठरु असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील टेकडीवर असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सरपंच राधाबाई जोगेवार, उपसरपंच वसंत सुगावे पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, यू.डी. इंगोले, व्ही. आर. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर, गट विकास अधकारी पी.पी. फांजेवाड यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख, जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, पूर्वीच्या काळात मूल जन्माला आल्यानंतर प्रत्येक घरात मुलांसारखी वृक्षांची जोपासणा करण्याची परंपरा होती. तीच परंपरा आजच्या काळातसुध्दा प्रत्येकाने जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूची कमतरता मोठया प्रमाणात जाणवली. त्यासाठी प्रत्येक गावक-यांनी वृक्षांचे संवर्धन केल्यास नैसर्गिकरित्या भरपूर ऑक्सीजन मिळेल असेही त्या म्हणाल्या.
यावेळी पंचायत समिती, ग्राम पंचायत व मंदीर समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्राणवायू देणारे पिंपळ, वड, कडूनिंब, बेल, बकुळ, सप्तपर्णी, अशोक, साग विविध फुलझाडे अशा पारंपारीक 240 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरंच वसंत सुगावे पाटील यांनी केले. सूत्रसंचालक विलास बोरगावे तर उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी शेख लतिफ यांनी मानले.
